बेळगाव : चेन्नई येथे राष्ट्रीय मोटरसायकल रेस व होंडा इंडिया टॅलेंट चषक स्पर्धेत घेण्यात आलेल्या चार रेसनंतर चेन्नईच्या स्वयम सुंदरने विजेतेपद, बेळगावच्या विवेक रोहित कापाडियाने उपविजेतेपद तर चेन्नईच्या रक्षीत देवने तिसरे स्थान पटकाविले. प्रतिवर्षी ही स्पर्धा जून ते डिसेंबर महिन्यात घेतली जाते. पण यावर्षी कोरोनाच्या कारणास्तवर डिसेंबरमध्ये चारही शर्यती घेण्यात आल्या.
या स्पर्धेत बेळगावचा विवेक कापाडिया पहिल्या पात्रता फेरीत जखमी झाला होता. तरीही त्यात त्याने तिसरा क्रमांक मिळविला. शनिवारच्या रेसमध्ये त्याने प्रथम तर त्याआधी शुक्रवारच्या रेसमध्ये दुसरा क्रमांक मिळविला. चारही रेसमध्ये मिळविलेल्या गुणांच्या आधारे चेन्नईचा स्वयम सुंदर विजेता, विवेक कापाडिया उपविजेता ठरला तर रक्षित देवने तिसरे स्थान पटकाविले. विवेक कापाडिया याची 2016 साली राष्ट्रीय होंडा रेस संघात निवड झाली होती. त्याने त्यानंतर या स्पर्धेत भाग घेऊन चांगली कामगिरी केली आहे.