किशन-प्रसाद यांच्याकडून ऍक्रोबेटिकचे सादरीकरण
प्रतिनिधी/ बेळगाव
ऍथलेटिक्स व योगा यांच्यातील मध्य साधणारा ऍक्रोबेटिक हा प्रकार सादर करून जगभरातील लोकांची कौतुकाची थाप मिळविलेल्या थोरात बंधूंनी आपले टॅलेंट तेलगू वाहिनीवर दाखविले आहे. रविवारी झालेल्या एका स्पेशल शो वेळी बेळगाव येथील प्रसाद व किशन थोरात यांनी आपले टॅलेंट दाखवत परीक्षकांना थक्क केले. तेलगू वाहिनीवर आपले टॅलेंट दाखविणारे ते बेळगावचे पहिलेच कलाकार ठरल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हनुमाननगर येथे राहणाऱया अशोक थोरात यांच्या प्रसाद व किशन या मुलांनी आतापर्यंत इंडियाज गॉट टॅलेंट, अमेरिका गॉट टॅलेंट यामधून आपली चुणूक दाखवून दिली आहे. हा विदेशातील क्रीडा प्रकार असूनही या तरुणांनी तो भारतात सर्वप्रथम सादर केला. त्यामुळे त्या दोघांचेही सर्वत्र कौतुक झाले. इंडियाज गॉट टॅलेंट या शोमधून बेळगावचे नाव देशभरात पोहोचले.
रविवारी झी तेलगू या तमिळ चॅनेलवर एका स्पेशल शोचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी किशन व प्रसाद यांनी ऍक्रोबेटिक सादर केले. चित्तथरारक कसरतींमुळे परीक्षकांनी त्यांना उत्स्फूर्त अशी दाद दिली. इतर राज्यांमध्येही त्या दोघांचे कौतुक होत असल्याने ही आमच्यासाठी कौतुकाची बाब असल्याचे त्यांचे वडील अशोक थोरात यांनी सांगितले.