अभिषेक जोशी यांनी न्यायालयीन परीक्षेत मारली बाजी
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव येथील न्यायालयातील अनेक वकील न्यायाधीशांच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत आहेत. 2020 साली झालेल्या परीक्षेमध्ये बेळगाव येथील अभिषेक रामचंद्र जोशी यांनी बाजी मारली असून त्यांची आता दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीशपदी निवड झाली आहे. यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
अभिषेक यांचे शिक्षण टिळकवाडी येथील स्वाध्याय विद्या मंदिर येथे सातवीपर्यंत झाले. त्यानंतर कारवार येथील हिंदू हायस्कूलमध्ये 8 वी ते 10 वीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांनी बेंगळूर युनिव्हर्सिटी लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन वकिली पदवी घेतली. त्यानंतर ते बेळगाव न्यायालयात वकील म्हणून सेवा बजावत होते. बेळगावमधील ज्येष्ट वकील ए. जी. कुलकर्णी यांच्याकडे त्यांनी ज्युनिअर म्हणून काम केले. न्यायाधीश परीक्षेमध्ये उत्तम गुणांनी ते पास झाले असून आता त्यांची दिवाणी न्यायालयासाठी न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे. त्यांना वडील आर. जे. जोशी, आई अंजली जोशी यांचे प्रोत्साहन लाभले. ज्येष्ट वकील ए. जी. कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. या निवडीबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.