तब्बल 7 हजार 500 कि. मी. चा दुचाकीवरून एकटय़ाने गाठला पल्ला
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावचा युवक आदित्य रायबागी याने तब्बल 7 हजार 500 कि. मी. चा प्रवास दुचाकीवरून केला. त्याने बेळगाव ते लेह (लडाख) हा खडतर असा प्रवास करत आपले स्वप्न पूर्ण केले. नवीन संस्कृतीची माहिती व्हावी, या उद्देशाने त्याने केवळ एकटय़ाने हा इतका मोठा प्रवास केला.
आदित्य केवळ 18 वर्षाचा असून सध्या बीबीएचे शिक्षण घेत आहे. त्याचे वडील दीपक रायबागी यापूर्वी एकदा लडाखला दुचाकीवरून जाऊन आल्याने आपणही लहान वयात हा प्रवास करावा, ही त्याची इच्छा होती. परंतु कोरोनामुळे त्याचे हे स्वप्न साकार होण्यास विलंब झाला. वडिलांची परवानगी असली तरी घरातील इतर व्यक्ती हा प्रवास करू देण्यास तयार नव्हते. परंतु त्याचा आत्मविश्वास पाहून अखेर त्याला कुटुंबीयांनी परवानगी दिली. 4 जुलै रोजी तो बेळगावमधून मनालीच्या दिशेने निघाला. मुंबई, अहमदाबाद, चंदीगढ असा प्रवास करत नवव्या दिवशी तो लडाखला पोहोचला.
मनाली ते लेह हा खडतर प्रवास
महाराष्ट्र, गुजरात यासारख्या गरमीच्या राज्यातून मनाली-लेह या थंड प्रदेशात जाण्याचा एक वेगळाच अनुभव होता. मनाली ते लेह हा प्रवास करण्यासाठी दुचाकीचालक तीन दिवस लावतात. परंतु आदित्यने हा प्रवास अवघ्या एका दिवसात पूर्ण करत लेह गाठले. लेह येथील खर्दुंगला या 18 हजार 380 फूट उंच ठिकाणी गेल्यावर एक वेगळा आनंद मिळाल्याचे आदित्यने सांगितले. परतीच्या प्रवासात श्रीनगर, अमृतसर, जयपूर, मुंबईमार्गे तो 28 जुलै रोजी बेळगावमध्ये दाखल झाला.