प्रतिनिधी / बेळगाव
दुसरा रेल्वेगेट येथे सोमवारी दुपारी 4.30 च्या सुमारास लोखंडी खांब कोसळला. सुदैवाने यावेळी वाहने धावत नसल्याने मोठा अनर्थ टळला. रहदारी पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक काहीवेळासाठी बंद केली. परंतु रेल्वे फाटकाच्या गुणवत्तेबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
रेल्वे फाटकावरून रेल्वे येण्या जाण्याच्या काळात वाहनचालकांना थांबविण्यासाठी लावण्यात आलेला लोखंडी खांब कोसळला. दुसरा रेल्वेगेट येथे प्रवाशांची नेहमीच ये-जा असते. सोमवारीही या रेल्वेगेट नजिक वर्दळ होती. परंतु दुपारची वेळ असल्यामुळे तितकीशी गर्दी नव्हती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. लोखंडी खांब कोसळून तो वाहनावर पडला असता तर मोठा अपघात घडला असता. परंतु यापुढे तरी फाटकाच्या गुणवत्तेबाबत काळजी घेणे रेल्वे विभागाला गरजेचे ठरणार आहे.