डिसेंबर महिन्यात मागविण्यात आल्या होत्या निविदा
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावसह देशातील महत्त्वाच्या विमानतळांवर फ्लाईंग स्कूल सुरू करण्याचा निर्णय विमानतळ प्राधिकरणाने घेतला. फ्लाईंग स्कूलमुळे बेळगाव परिसरातील विद्यार्थ्यांना पायलट होण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. परंतु हा प्रस्ताव लालफितीत अडकल्याने फ्लाईंग स्कूल सुरू करण्याबाबत विलंब केला जात आहे. परंतु गुलबर्गाप्रमाणे बेळगावमध्येही फ्लाईंग स्कूलसाठी वेगवान प्रयत्न व्हावेत, अशी मागणी केली जात आहे.
विमान प्राधिकरणाच्या माध्यमातून बेळगाव, गुलबर्गा, जळगाव, खजुराहो, लीलाबरी, सालेम या विमानतळांवर फ्लाईंग स्कूल सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्राधिकरणाचे चेअरमन अरविंद सिंग यांनी दिली होती. पुढील पाच वर्षांमध्ये विमानांचा विस्तार मोठय़ा प्रमाणात होणार असल्याने 9488 पायलटची आवश्यकता भासणार आहे. एव्हिएशन इंडस्ट्री दिवसेंदिवस वाढत असून विद्यार्थिनी या अभ्यासक्रमाकडे प्रवेश घेताना दिसत आहेत.
नागरी उड्डाण विभागातर्फे प्रत्येक वषी 700 ते 800 व्यावसायिक पायलटांना लायसेन्स देण्यात येतात. यातील 30 टक्के पायलट हे परदेशात प्रशिक्षणासाठी जातात. त्यामुळे देशात पायलटची गरज पुढील काळात मोठय़ा प्रमाणात भासणार आहे. त्यामुळे आतापासूनच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिल्यास स्थानिक पायलट घडणार आहेत. यासाठीच बेळगावसह लहान विमानतळांवर फ्लाईंग स्कूल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे बेळगावचे विद्यार्थीही या फ्लाईंग स्कूलची आतुरतेने वाट पाहात आहेत. परंतु हे फ्लाईंग स्कूल सध्या लालफितीत अडकले आहे.
बेळगावकडे दुर्लक्ष का?
फ्लाईंग स्कूलसाठी विमानतळ प्राधिकरणाकडून निविदाही मागविण्यात आल्या होत्या. 22 डिसेंबर 2020 पूर्वी निविदा जमा करण्याची जाहिरात देण्यात आली होती. परंतु त्यानंतर मात्र फ्लाईंग स्कूलबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. गुलबर्गा येथील फ्लाईंग स्कूलसाठी प्रयत्न सुरू असताना बेळगावमध्ये दुर्लक्ष का? असा प्रश्न या क्षेत्राशी निगडीत विद्यार्थी विचारत आहेत.