बेळगावच्या लौकिकात खोवला मानाचा तुरा
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावच्या राष्ट्रीय मिलिटरी स्कूलची देशातील सर्वोत्कृष्ट पाच मिलिटरी स्कूल्समध्ये निवड झाली आहे. या निवडीमध्ये बेळगावच्या या शाळेच्या लौकिकात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
बेळगावच्या राष्ट्रीय मिलिटरी स्कूलची स्थापना 30 डिसेंबर 1945 रोजी झाली. सहाव्या किंग जॉर्जने या शाळेची स्थापना केली. पूर्वी लष्करी परीक्षेला बसणाऱया विद्यार्थ्यांसाठी शाळेत प्रशिक्षण दिले जात असे. 26 जानेवारी 1950 मध्ये सदर शाळा किंग जॉर्ज मिलिटरी कॉलेज म्हणून सुरू झाली. जुलै 1952 मध्ये निवासी शाळेमध्ये रुपांतर करण्यात येऊन या शाळेला किंग जॉर्ज स्कूल बेळगाव म्हणून नाव देण्यात आले. त्यावेळी या शाळेतील विद्यार्थ्यांना सिनियर केंब्रिजच्या परीक्षा देणे बंधनकारक होते. शाळेने आपला अमृतमहोत्सवी सोहळा उत्साहात साजरा केला आहे.
तथापि, 1963 मध्ये सदर शाळा सीबीएसई मंडळाशी संलग्न करण्यात आली. 1966 मध्ये शाळेचे बेळगाव मिलिटरी स्कूल म्हणून नामकरण करण्यात आले. 1998 मध्ये पुन्हा मिलिटरी स्कूल बेळगाव असे आणि 2007 मध्ये पुन्हा शाळेचे नामकरण राष्ट्रीय मिलिटरी स्कूल म्हणून करण्यात आले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी लष्करी सेवेत उच्च पदे भूषवावीत तसेच सीबीएसईच्या परीक्षेत गुणवत्ता मिळवावी, हे शाळेचे ध्येय आहे. शाळेचा माजी विद्यार्थी संघ हे शाळेचे वैभव आहे. कारण या संघामध्ये नामवंत उद्योजक, राजकारणी, कायदेतज्ञ, शिक्षणतज्ञ यांच्यासह उच्च विद्याविभूषित व्यक्तींचा समावेश आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे या यशाबद्दल मोठा सोहळा करणे शक्मय नसल्याने दि. 30 डिसेंबर रोजी शाळेने प्लॅटिनम ज्युबिली साजरी केली. शाळेचे प्राचार्य सेनापदक विजेते ब्रिगेडिअर रोहित चौधरी, काही माजी विद्यार्थी आणि शिक्षक यांनी शाळेच्या सभागृहात एकत्रित येऊन कोविड नियमांचे पालन करून केक कापला व यशाचा आनंद साजरा केला.