माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे आश्वासन : युवा समितीच्या पदाधिकाऱयांनी घेतली भेट
प्रतिनिधी /मुंबई
सीमाभागात मराठी बांधवांवर कर्नाटक सरकारकडून दडपशाही केली जात आहे. म. ए. समितीच्या पदाधिकाऱयांवर शाई हल्ला, छत्रपती शिवरायांचा अवमान, मराठी भाषिक तरुणांवर गुन्हे दाखल करणे, असे प्रकार सुरू असून याला आवर घालण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ घेऊन गृहमंत्री अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी प्रयत्न करू, असे आश्वासन माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार यांनी युवा म. ए. समितीच्या पदाधिकाऱयांना दिले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केल्यानंतर निषेध व्यक्त करण्यासाठी जमलेल्या मराठी तरुणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले आहेत. देशद्रोहासारखा गंभीर गुन्हा घालण्याचा विचार सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने व नेतेमंडळींनी यामध्ये लक्ष घालून गुन्हे मागे घेण्यास भाग पाडावे, अशी मागणी युवा समितीच्यावतीने शरद पवार यांच्याकडे मुंबई येथे करण्यात आली. शरद पवार यांनी हा प्रश्न आता केंद्राकडे मांडण्याची सूचना केली. गृहमंत्र्यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून देऊ, असे आश्वासन दिले.
महाराष्ट्रातील नेत्यांकडून निषेध व्यक्त
युवा समितीच्या पदाधिकाऱयांनी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेतेमंडळींची भेट घेऊन त्यांना बेळगावमध्ये सुरू असलेल्या अन्यायाबद्दल माहिती दिली. मराठी तरुणांना विविध गुन्हय़ांमध्ये
अडकवून सीमाप्रश्नाची धार कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे युवकांनी नेतेमंडळींना पटवून दिले. महाराष्ट्राचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत, मंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांची भेट घेतली. यावेळी म. ए. समितीचे सरचिटणीस श्रीकांत कदम, कार्याध्यक्ष सूरज कुडुचकर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, किरण मोदगेकर, रवी निर्मळकर, आशिष कोचेरी, सूरज कणबरकर, सिद्धार्थ चौगुले यांच्यासह इतर उपस्थित होते.