उमेश दंडगी यांच्या अवयवदानामुळे चौघांना जीवदान : अवयव पोहोचवण्यासाठी केएलई हॉस्पिटल ते सांबरा विमानतळापर्यंत ग्रीन कॉरिडॉर
- लिव्हर : बेंगळूरमधील स्पर्श हॉस्पिटलला रवाना
- एक किडनी : धारवाडच्या एसडीएम हॉस्पिटलला
- दुसरी किडनी : हुबळीच्या तत्त्वदर्शी हॉस्पिटलला
‘ऑपरेशन’ सक्सेस…
- ग्रीन कॉरिडॉरमधून लिव्हर पोहोचले बेंगळूरला
- बेनडेड झालेल्या व्यक्तीचे करण्यात आले अवयवदान
- तज्ञ वैद्यकीय अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया पूर्ण
- बेळगावच्या वैद्यकीय सेवेच्या नावलौकिकात पडली भर
प्रतिनिधी /बेळगाव
दिवस बुधवारचा… वेळ दुपारी दीड ते अडीच दरम्यानची…. केएलई ते सांबरा विमानतळापर्यंतचा रस्ता ग्रीन कॉरिडॉर म्हणून घोषित…. संपूर्ण रस्ते निर्मनुष्य… आणि केएलईची रुग्णवाहिका वेगाने सांबरा विमानतळावर दाखल…. दुपारी अडीचच्या इंडिगो विमानातून लिव्हर बेंगळूरच्या स्पर्श हॉस्पिटलपर्यंत सुरक्षित पोहोचले अन् बेळगावच्या तत्पर वैद्यकीय सेवेचे ऑपरेशन सक्सेसफूल झाले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे, महाबळेश्वरनगरचे उमेश बसवाणी दंडगी (वय 51) घरात पडून त्यांच्या डोक्मयाला दुखापत झाल्याने त्यांना केएलई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचा ब्रेनडेड झाला. त्यानंतर कुटुंबीयांच्या संमतीने त्या व्यक्तीचे लिव्हर बेंगळूरमधील रुग्णासाठी, एक किडनी धारवाडच्या एसडीएम हॉस्पिटलला व एक किडनी तत्त्वदर्शी हॉस्पिटलला पाठविली.
अलीकडच्या काळात अवयव रोपणाबाबत जागरुकता करण्यात आल्याने अवयवदान करण्याचे प्रमाणही वाढले आहे. मात्र, काही अवयवांबाबत सरकारी प्रक्रिया पूर्ण होणे व सरकारकडून परवानगी मिळणे महत्त्वाचे असते. लिव्हरसंदर्भात हा नियम लागू आहे. जर ब्रेनडेड झाल्यास सरकारच्या वैद्यकीय पोर्टलवर त्याची माहिती द्यावी लागते. त्यानंतर कर्नाटक सरकारच्या आरोग्य खात्याकडून प्रतीक्षा यादीनुसार नाव आणि इतर तपशील जाहीर केला जातो.
सहा तासांपर्यंत रोपण करणे आवश्यक
केएलई हॉस्पिटलने ही सर्व प्रक्रिया आणि नियमावली पूर्ण केली आणि बेंगळूरहून डॉक्टरांचे पथक बेळगावच्या केएलई हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यानंतर लिव्हरसह डॉक्टरांनी ग्रीन कॉरिडॉरमधून सांबरा विमानतळापर्यंत आणि तेथून बेंगळूरपर्यंत सुरक्षित प्रवास केला. एखाद्या अवयवाचे जितक्मया लवकर रोपण केले जाते, तितकी ती प्रक्रिया सुलभ होऊ शकते. किडनी, लिव्हर अथवा हृदय सहा तासांपर्यंत सुस्थितीत राहू शकते आणि त्यामुळे त्या कालावधीतच त्याचे रोपण करणे आवश्यक असते.
तज्ञ डॉक्टरांमुळे रुग्णाला जीवदान
ही सर्व प्रक्रिया आव्हानात्मक तितकीच डॉक्टरांच्या कौशल्याची परीक्षा पाहणारी असते. मात्र, तज्ञ डॉक्टरांमुळे रुग्णाला जीवदान मिळते. लिव्हर रोपणामुळे रुग्णाला जीवदान मिळाले आहे. शिवाय अलीकडच्या काळात केएलई हॉस्पिटलमध्ये हृदयरोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण होत आहेत. ग्रीन कॉरिडॉरमुळे केवळ अवयव घेऊन जाणारी रुग्णवाहिका वगळता इतर सर्वांना रस्त्याच्या वापरावर निर्बंध घातलेले असतात. उमेश दंडगी यांच्या अवयवदानामुळे चार जणांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे डॉक्टरांनी आणि ज्यांच्यावर हे अवयव रोपण करण्यात येणार आहेत, त्या सर्वांनी दंडगी कुटुंबीयांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.