वर्षभरात 7 हजार 800 जणांनी काढला पासपोर्ट : ऑनलाईन पासपोर्टमुळे नागरिकांना सोयीचे : पुरावा म्हणूनही पासपोर्ट उपयोगी
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाचे संकट असले तरी परदेशात जाणाऱयांची संख्या काही कमी नाही. शिक्षण, नोकरी, उद्योग, पर्यटन यासाठी नागरिक परदेशात जात असतात. परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट अनिवार्य आहे. त्यामुळे पासपोर्ट काढणाऱयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
मागील वर्षभरात बेळगाव येथील पासपोर्ट कार्यालयातून तब्बल 7 हजार 855 नागरिकांनी पासपोर्ट काढून घेतले आहेत. बेळगावमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरू झाल्यामुळे नागरिकांना सोयीचे होत असून, यामुळे पासपोर्ट काढणाऱयांची संख्या वाढली आहे.
बेळगावमध्ये कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयातील आवारात पोस्ट-पासपोर्ट सेवा केंद्र आहे. या ठिकाणी पासपोर्टसाठी अर्ज केलेल्या नागरिकांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते. कोरोनामुळे परदेशात जाणाऱयांची संख्या रोडावली होती. परंतु परिस्थिती पूर्वपदावर आल्याने पासपोर्ट काढणाऱयांची संख्या वाढली आहे. केवळ परदेशात जाणारेच नव्हे तर एक पुरावा म्हणूनदेखील नागरिक पासपोर्ट काढून घेत आहेत. पासपोर्ट ऑनलाईन काढला जात असल्यामुळे नागरिकांना ते सोयीचे ठरत आहे.
केंद्रासाठी स्वतंत्र इमारत
यापूर्वी बेळगावमध्ये पासपोर्ट कार्यालय नसल्याने हुबळी येथे जाऊन पासपोर्ट काढावा लागत होता. ही समस्या जाणून तत्कालीन पासपोर्ट विभागाचे अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांच्या प्रयत्नांतून बेळगावमध्ये पोस्ट पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाले. मुख्य पोस्ट कार्यालयात हे सेवा केंद्र सुरू होते. सध्या या सेवा केंद्रासाठी स्वतंत्र इमारत देण्यात आली आहे. त्या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी व फोटो घेतला जात आहे.
दररोज 75 जणांना पासपोर्ट
कोरोनापूर्वी बेळगाव पासपोर्ट कार्यालयात दररोज 100 च्या आसपास नागरिकांच्या कागदपत्रांची तपासणी केली जात होती. परंतु कोरोनामुळे यावर निर्बंध आले. मध्यंतरी बरेच दिवस हे कार्यालय बंद ठेवण्यात आले होते. दररोज 25 नागरिकांना कागदपत्रांच्या तपासणीसाठी बोलाविले जात होते. कोरोनाचा धोका कमी झाल्यानंतर हळूहळू ही संख्या वाढविण्यात आली. सध्या दररोज 75 जणांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अपॉईंटमेंट दिली जात आहे.
कोरोनाकाळातही संख्या वाढली
बेळगावमध्ये मुख्य पोस्ट कार्यालयाच्या सहकार्याने पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात आले आहे. येथे पासपोर्ट काढणाऱयांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील वर्षभरात 7 हजार 855 नागरिकांनी बेळगावमध्ये पासपोर्टसाठी कागदपत्रांची तपासणी करून घेतली असल्याची माहिती बेळगाव विभागाचे पोस्ट अधीक्षक एच. बी. हसबी यांनी दिली.