डिझेलही 82 वर : पहिल्यांदाच इतकी वाढ
प्रतिनिधी / बेळगाव
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती व त्यातच सरकारने वाढविलेला अधिभार यामुळे इंधनाच्या किमतींमध्ये वाढ होत आहे. मंगळवारी बेळगावमध्ये पेट्रोल दराने 90 पार केली. डिझेलही 82 वर पोहोचल्याने वाहनचालकांचे आर्थिक गणित कोलमडू लागले आहे.
बहुतेक जणांकडे दुचाकी, चार चाकी वाहने आहेत. या वाहनांमध्ये दररोज पेट्रोल-डिझेलची आवश्यकता असते. परंतु मागील काही दिवसांपासून पेट्रोलच्या किमती भरमसाट वाढल्या आहेत. प्रतिलिटर 80 रुपयांवर असलेले पेट्रोल आता 90 च्या पुढे गेले आहे. यामुळे पेट्रोल पंपांवर पेट्रोल भरताना वाहनचालक चार वेळा विचार करीत आहेत. मागील आठवडय़ात पेट्रोलचा दर 89 रुपयांवर स्थिर होता.
परंतु त्यानंतर हळूहळू दरवाढ होत गेली.
इंधनाची विक्रमी दरवाढ
इंधनाच्या दरात मंगळवारी विक्रमी दरवाढ पाहायला मिळाली. ही दरवाढ अशीच सुरू राहिल्यास थोडय़ात दिवसात ती शंभरचा टप्पा गाठेल, याची धडकी वाहन चालकांना भरली आहे. पेट्रोल दर 90 च्या पुढे गेल्यामुळे पहिल्यांदाच इतकी दरवाढ पाहायला मिळत आहे. यामुळे वाहन फिरवताना विचार करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. आधीच महागाईचा भडका उडालेला असताना इंधनाच्या दरवाढीने नागरिक हैराण झाले आहेत.
शहरानुसार पेट्रोल-डिझेलचे प्रतिलिटर दर
शहराचे नाव | पेट्रोल | डिझेल |
बेळगाव | 90.06 | 82.02 |
कोल्हापूर | 93.98 | 83.26 |
गोवा | 85.36 | 81.77 |