मंदिरांना आकर्षक रोषणाई : सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहरासह उपनगरांमध्ये माघी गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त गणेश मंदिरांना आकर्षक अशी फुलांची आरास व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शुक्रवारी सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. कोरोनामुळे साध्या पद्धतीने मंदिरांमध्ये गणेश जयंती साजरी झाली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
टिळकवाडी येथील स्वयंभू गणेश मंदिर
माघी गणेश जयंतीनिमित्त टिळकवाडी येथील स्वयंभू गणेश मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गणेश मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. अभिषेक, विनायक कथा, पूजन, गणहोम, सत्यनारायण पूजा, गणेश जन्मोत्सव कार्यक्रम करण्यात आला. दरम्यान, आयोजित 600 ते 700 भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत प्रसादाचे भाविकांना वाटप करण्यात
आले.
दर्शनासाठी भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती. यावेळी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष दामोदर भोसले, शंकर शिंदे, सुरेश पाटील, राजू जाधव, रामा जोशीलकर, रमेश गवळी, नेताजी हुंदरे, नाथाजी कदम यांच्यासह ट्रस्ट कमिटीचे सदस्य उपस्थित होते. बाबुराव देशपांडे व विलास कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले.
चन्नम्मा चौक येथील गणेश मंदिर
चन्नम्मा चौक येथील गणेश मंदिरात माघी गणेश जयंतीनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. गणपतीला अभिषेक व रात्री जन्मोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला. विनायक चौगुले व वैष्णवी चौगुले यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. रमेश चोपडे व रोहन चोपडे यांनी पौरोहित्य केले. भाविकांना तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले.
सिद्धिविनायक देवस्थान, मंडोळीरोड
मंडोळीरोड, टिळकवाडी येथील सिद्धिविनायक देवस्थान येथे विधिवतपणे गणेश जयंती साजरी करण्यात आली. सकाळी अभिषेक, गणेश जन्मोत्सव व इतर धार्मिक विधी पार पडल्या. साध्यापद्धतीने गणेश जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. दर्शनासाठी शुक्रवारी सकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, नंदिता गिलबिले, ज्योती कलघटगी, वर्षा गिलबिले, अश्विनी गोडसे, रेश्मा फाटक, रितू जाधव यांनी पाळणा म्हटला.
यावेळी अध्यक्ष बाळकृष्ण गिंडे, सचिव पंढरी परब, कार्यकारी संचालक वैजनाथ गिलबिले, अशोक ढेगसकर, प्रशांत पाटील, राजू दळवी, सतीश गोडसे, राजू सावंत, महेश तवणोजीचे, अशोक तवणोजीचे, श्रीधर नाडेकर, संजय कुलकर्णी सुरेश प्रभू, सुबोध गावडे, मोहन सावंत यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. उदय देशपांडे गुरुजींनी पौरोहित्य
केले.
कपिलेश्वर गणेश मंदिर
कपिलेश्वर मंदिर परिसरातील गणेश मंदिरात गणेश जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी गणेश अथर्वशीर्ष पठण करून रुद्राभिषेक करण्यात आला. यानिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. गणरायाच्या मूर्तीला आकर्षक असा फेटा बांधण्यात आला होता.
मंदिर सजावटीसाठी विनायक पालकर यांचे सहकार्य लाभले. परशराम कुरणे यांनी गणरायाला फेटा बांधला. नागराज कट्टी यांनी पौरोहित्य केले. मंदिराचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी अभिजित चव्हाण, राजू भातकांडे, राहुल कुरणे, विवेक पाटील, सचिन आनंदाचे गणेश देवर, अनंत बाळेकुंद्री, दौलत जाधव, वैभव चौगुले, शुभम बाचुळकर, राजू पाटील, यशवंत राजपूत यासह इतर सेवेकरी उपस्थित होते.
गणाचारी गल्ली येथे महाप्रसादाचे वितरण
बकरीमंडी गणाचारी गल्ली येथील गणेश जयंती उत्सव मंडळ व श्रीराम सेना हिंदुस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने माघी गणेश जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त जन्मोत्सव व सायंकाळी महाआरतीचे आयोजन केले होते. पतंगाच्या आकारामध्ये आकर्षक फुलांची आरास नेत्रदीपक ठरली होती. सायंकाळी 5 हजार भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, जी. जी. बॉईज, रेणुकादेवी महिला मंडळ यांच्यासह गणाचारी गल्ली व आसपासच्या परिसरातील भाविक उपस्थित होते. दर्शनासाठी सकाळपासून भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
वडगाव बाजार गल्लीत गणेश जयंती
वडगाव बाजार गल्ली येथील गणेश मंदिरात पूर्वाभाद्र तिथीवर गणेश जयंती पार पाडली. यानिमित्त गणेशमूर्तीला जलाभिषेक, रुद्राभिषेक, कुंकूमार्चन झाल्यानंतर तीर्थस्नान घालण्यात आले. पुजारी अजित कुलकर्णी यांनी मूर्तीला हार व फुलांनी सजवून पाळण्यात घालण्यात आले. त्यानंतर तीर्थप्रसाद वितरित करण्यात आला. दर्शनासाठी भाविकांनी गर्दी झाली होती. या कार्यक्रमाला मंडळाचे कार्यकर्ते, महिला व भाविक उपस्थित होते.