विमानतळ प्राधिकरणाची माहिती
प्रतिनिधी/ बेळगाव
देशातील निवडक विमानतळांवर फ्लाईंग स्कूल सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने मांडला आहे. बेळगाव, गुलबर्गासह इतर सहा विमानतळांवर हे फ्लाईंग स्कूल सुरू करण्यात येणार आहे. देशांतर्गत विमान प्रवास मोठय़ा प्रमाणावर वाढला असल्याने पायलटची गरज भासत आहे. ही गरज या फ्लाईंग स्कूलमुळे भागविता येणार आहे. यामुळे बेळगावच्या विमानतळाला अधिक महत्व मिळणार आहे.
नुकतीच नवी दिल्ली येथे विमानतळ ऍथॉरीटीचे चेअरमन अरविंद सिंग यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेवेळी त्यांनी ही माहिती दिली आहे. सरकारने बेळगाव, जळगाव, खजुराहो, गुलबर्गा, लिलाबरी व सालेम या विमानतळांवर फ्लाईंग स्कूल सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. पुढील पाच वर्षात 9488 पायलटची गरज भासणार आहे. त्यामुळे त्या प्रमाणात पायलट तयार करणे गरजेचे ठरणार आहे.
नागरि उड्डाण विभागातर्फे प्रत्येक वषी 700 ते 800 व्यावसायिक पायलट लायसन्स देण्यात येते. यापैकी 30 टक्के पायलट हे परदेशात प्रशिक्षणासाठी जातात. यामुळे पायलट स्कूलची भविष्यात गरज भासणार आहे. यातील एक पायलट स्कूल हे बेळगावमध्ये होणार असल्यामुळे बेळगावच्या विमानतळाचा विकास होणार आहे.
2018 मध्ये तत्कालिन केंद्रीय नागरि उड्डाणमंत्री जयंत सिन्हा यांनी आपल्या बेळगाव भेटी वेळी बेळगावला फ्लाईंग स्कूल सुरू करण्यासाठीचे आश्वासन दिले होते. आता या प्रस्तावाला अंतिम स्वरूप मिळाले आहे. त्यामुळे येत्या काळात बेळगावमध्ये एक सुसज्ज असे फ्लाईंग स्कूल सुरू करण्यात येणार आहे.