मंगळूर, उडुपी व चामराजनगरमध्ये फैलाव सुरू : कोरोना, ब्लॅक फंगस रोखण्यासाठी व्यापक उपाययोजना
प्रतिनिधी /बेळगाव
ब्लॅक फंगसपाठोपाठ बेळगावात झिका अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळमध्ये झिकाचे रुग्ण आढळून आले असून कर्नाटकातील तीन जिल्हय़ात झिकाचा फैलाव सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बेळगावातही अलर्ट जारी केला आहे.
जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ यांनी रविवारी ‘तरुण भारत’शी बोलताना ही माहिती दिली. केरळ व महाराष्ट्रामध्ये अद्याप कोरोना रुग्णसंख्या वाढतीच आहे. यातच केरळमध्ये झिकाचे रुग्ण आढळून आले आहेत. कर्नाटकातील मंगळूर, उडुपी व चामराजनगरमध्ये फैलाव सुरू झाला आहे.
ही गोष्ट लक्षात घेऊन आरोग्य विभागाने बेळगावातही अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर तपासणी वाढविण्यात आली आहे. डेल्टा प्लसचा फैलाव वाढण्याचा धोका लक्षात घेऊन बेळगाव जिल्हय़ातील सौंदत्ती यल्लम्मा देवी, जोगुळभावी सत्यम्मा देवी, चिंचली मायाक्का देवी, बडकुंद्री व्होळेम्मा देवी आदी प्रमुख मंदिरात देवदर्शन बंद ठेवण्यात आले आहे.
आरोग्य विभागाकडून कोरोना, ब्लॅक फंगसचा फैलाव रोखण्यासाठी व्यापक उपाययोजना सुरू आहेत. याबरोबरच डेल्टा प्लसचा प्रसार होऊ नये, यासाठीही खबरदारी घेण्यात येत आहे. सरकारने सर्वेक्षण सुरू केले असून बिम्समधून गेल्या आठवडय़ात पंधरा जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. सध्या शहर व उपनगरात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. डासांपासून डेंग्यूचा फैलाव होतो. आता डासांपासून फैलाव होणाऱया झिकाचा धोका निर्माण झाला आहे.
कोरोना व्हेरिएंट्स तपासण्यासाठी सर्वेक्षण : डॉ. उमेश कुलकर्णी
कोरोना व्हेरिएंट्स तपासण्यासाठी सातत्याने सर्वेक्षण केले जात आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या मार्गसूचीनुसार गेल्या आठवडय़ात बिम्समधील पंधरा रुग्णांचे स्वॅब बेंगळूरला पाठविण्यात आले आहेत. डेल्टा प्लसचे रुग्ण बेळगावात आहेत का? हे तपासण्याबरोबरच कोरोनामध्ये आणखी कोणते व्हेरिएंट्स आले आहेत? याचे सर्वेक्षण करण्यात येत आहे, अशी माहिती बिम्सचे प्रभारी वैद्यकीय संचालक डॉ. उमेश कुलकर्णी यांनी दिली.
गेल्या आठवडय़ात पाठविण्यात आलेल्या स्वॅबचा अहवाल आलेला नाही. सरकारी मार्गसूचीनुसार सर्वेक्षण सुरूच असते. कारण, कोरोना व्हायरसचे वेगवेगळे व्हेरिएंट्स सुरू आहेत. ते जाणून घेण्यासाठी सातत्याने सर्वेक्षणाचे कार्य चालते. कोणत्या भागात कोणते व्हेरिएंट्स आहेत, कोरोना विषाणूमध्ये कोणता बदल झाला आहे? हे तपासणीअंतीच समजते. त्यामुळे बेळगाव येथील काही संशयितांचे स्वॅब पाठविण्यात आले आहेत, असे डॉ. उमेश कुलकर्णी यांनी सांगितले.
ब्लॅक फंगसचे रुग्णही वाढतेच
कोरोना महामारीचा फैलाव कमी होत चालला असला तरी ब्लॅक फंगसचे संकट मात्र कमी होईना. जिल्हय़ात त्याचा फैलाव वाढतो आहे. आतापर्यंत 415 कोरोनाबाधितांमध्ये ब्लॅक फंगस आढळून आला असून त्यापैकी 38 जणांचा मृत्यू झाला आहे. आजवर 187 जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 252 जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तर उर्वरित 163 बाधितांवर खासगी इस्पितळात उपचार करण्यात आले आहेत. सध्या 191 ब्लॅक फंगस बाधितांवर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार सुरू आहेत. तर 180 जण बरे झाले असून त्यांना घरी जाऊ देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ यांनी दिली.