स्वॅब जमविण्याचे प्रमाण वाढले, क्वारंटाईनची संख्या अडीच हजाराजवळ
प्रतिनिधी बेळगाव
सलग तिसऱया दिवशीही बेळगावला दिलासा मिळाला आहे. मंगळवारी राज्य आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या बुलेटिनमध्ये बेळगावमधील पॉझिटिव्ह रुग्णांचा उल्लेख नव्हता. मात्र, हॉटस्पॉटमधून स्वॅब जमविण्याचे प्रमाण वाढविण्यात आले आहे.
मंगळवारी संपूर्ण राज्यात 11 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. गुलबर्गा, बागलकोट, गदग व बेंगळूर येथील रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे बेळगाव येथील बाधितांची संख्या 54 वरच थांबली आहे. मंगळवारी कोरोना मुक्त झालेल्या कॅम्प येथील तरुणांची सुटका करण्यात आली. दरम्यान जिल्हा सर्वेक्षण विभागाने जारी केलेल्या बुलेटिनमधील माहितीनुसार 14 दिवसांच्या क्वारंटाईनमधील संशयितांची संख्या वाढली आहे. ही संख्या मंगळवारी 2395 वर पोचली आहे. जिल्हय़ातील 4663 जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे.
आतापर्यंत 1087 जणांनी 14 दिवसांचे तर 1134 जणांनी 28 दिवसांचे क्वारंटाईन पूर्ण केले असून एकूण 3161 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी 1822 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एकूण बाधितांची संख्या 54 वर थांबली आहे. यापैकी एका वृद्धेचा मृत्यू झाला आहे. तर सात जण कोरोनामुक्त झाले आहेत.
स्वॅब तपासणीचे काम रखडले
जिल्हा प्रशासनाला बेळगाव येथून पाठविलेल्या 1463 जणांच्या स्वॅब तपासणीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. यावरून स्वॅब तपासणीचे काम रखडल्याचे स्पष्ट होते. आरोग्य विभागाने हॉटस्पॉटमध्ये स्वॅब तपासणीची मोहीम वाढविली आहे. एक -दोन दिवसात स्वॅब तपासणी अहवाल येण्याची शक्यता आहे.
बेळगावात लॉकडाऊन शिथिल नाही
वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन बेळगावसह कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या बेंगळूर, म्हैसूर, बागलकोट, विजापूर, गुलबर्गा, बिदर, मंगळूर, जिल्हय़ात लॉकडाऊनमध्ये बदल न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या व्यतिरिक्त ग्रीनझोनमध्ये येणाऱया जिल्हय़ात लॉकडाऊन शिथिल करण्याचे ठरविण्यात आले आहे. हॉटस्पॉटमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व इतर अत्यावश्यक सुविधांना परवानगी असणार आहे.