बेळगाव / प्रतिनिधी :
येळ्ळूरमध्ये कोरोनाबाधित महिला रुग्ण आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर तातडीने जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन येळ्ळूर गाव सीलबंद करण्याचे आदेश दिले. याचबरोबर आरोग्य व पोलीस विभागाने योग्य ती दक्षता घ्यावी, अशी सूचना केली आहे. तीन किलोमीटरपर्यंतचे सर्व व्यवहार बंद ठेवावेत. याचबरोबर कायद्याचा भंग करणाऱयांवर कठोर कारवाई करा, असा आदेशही जिल्हाधिकाऱयांनी बजावला आहे.
येळ्ळूरमधील एक तरुण दिल्लीतील तबलिगी जमातच्या मरकजमध्ये सामील झाला होता. त्यानंतर तो येळ्ळूरमध्ये परतला होता. काही दिवसांपूर्वी त्याला आणि त्याच्या पत्नीला ग्राम पंचायत व आरोग्य विभागाने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्या तरुणाचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले होते. मात्र, आता त्याच्या पत्नीला कोरोना झाल्याचा अहवाल आला आहे. त्यामुळे येळ्ळूर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
गुरुवारी सकाळीच ही माहिती आरोग्य विभागाने दिली. त्यानंतर तातडीने येळ्ळूरच्या सर्व सीमा सीलबंद करण्यात आल्या आहेत. आता गावातून कोणी बाहेर जाऊ शकणार नाही तर बाहेर येणाऱयांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. ग्राम पंचायतीने तातडीने कोरोनाग्रस्त कुटुंबाचा परिसर बंद केला आहे. आरोग्य विभागाच्यावतीने पूर्ण घराचे सॅनिटायझर करण्यात आले आहे.