प्रतिनिधी / बेळगाव
सलग तिसऱया दिवशीही बुधवारी बेळगावला दिलासा मिळाला आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये राज्यातील 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे जाहीर करण्यात आले असून यामध्ये बेळगावातील एकाही रुग्णाचा समावेश नाही. तर शेजारच्या बागलकोट जिल्हय़ात मात्र कोरोनाग्रस्तांचा आलेख वाढतो आहे.
जिल्हा सर्वेक्षण विभागाने बुधवारी सायंकाळी प्रसिद्धीस दिलेल्या बुलेटिनमध्येही बेळगावकरांना दिलासा देणारी माहिती आहे. गेल्या 24 तासात 305 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून प्रशासनाला आणखी 147 अहवालांची प्रतीक्षा आहे.
आतापर्यंत 7 हजार 105 जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. तर 4 हजार 80 जणांना जिल्हय़ात क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. 1613 जणांनी चौदा दिवसांची तर 1374 जणांनी अठ्ठावीस दिवसांचे क्वारंटाईन पूर्ण केले असून कोरोनाग्रस्तांचे बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे.
आतापर्यंत 5 हजार 807 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. 5 हजार 537 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 73 पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये हिरेबागेवाडी येथील एका वृद्धेचा मृत्यू झाला आहे. 34 जण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना घरी जाऊ देण्यात आले आहे. आणखी 38 जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत.
फ्लू क्लिनिकसमोर गर्दी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमधील आवारात आयएमए हॉलमध्ये फ्लू क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. या विभागात तपासणीसाठी येणाऱयांची गर्दी वाढत चालली आहे. परप्रांतीयांना गावी जाण्यासाठी तपासणी सक्तीची केल्यामुळे आयएमए हॉलबाहेर परप्रांतीयांच्या रांगा लागल्या आहेत. या विभागातून प्रमाणपत्र घेतल्यानंतरच त्यांची पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाते.