प्रतिनिधी / बेळगाव :
बेळगावात पूर्वी आयकर विभागाचे मुख्य आयुक्त ही जागा होती. मात्र, आता हुबळी येथील आयकर विभागाच्या कार्यालयात मुख्य आयुक्त ही जागा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे बेळगावमधील इन्कम टॅक्स प्रॅक्टीशनरना हुबळीला धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे मोठा त्रास होत असून पुन्हा आयकर विभागाचे मुख्य आयुक्तपद बेळगावमध्ये उपलब्ध करावे, अशी मागणी इन्कम टॅक्स प्रॅक्टीशनर असोसिएशनच्यावतीने अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकुर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
सरकारला बेळगावातून मोठय़ा प्रमाणात कर जमा होतो. जिह्यामध्ये इन्कम टॅक्स प्रॅक्टीशनरांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करावा आणि बेळगावातच मुख्य आयुक्तपद नियुक्त करावे. त्यामुळे इन्कम टॅक्स प्रॅक्टीशनरांचा तसेच जनतेचाही वेळ आणि खर्च वाचेल, असे निवेदनात म्हटले आहे. सहकार खात्यामध्ये अनेक खटले प्रलंबित आहेत. ते निकालात काढण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
गेल्या 20 वर्षांपासून ही जागा भरण्यात आली नाही. आता बेळगावचा विस्तार वाढत चालला आहे. याचबरोबर स्मार्ट सिटीमध्येही समावेश करण्यात आला आहे. तेव्हा या ठिकाणी आयुक्त असणे गरजेचे आहे, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी कर सल्लागार अभय फडके यांनी येत्या अर्थसंकल्पामध्ये ई-फाईली याचबरोबर 81 ए रिलीफ याविषयीची माहिती अनुराग ठाकुर यांना दिली. कर सल्लागारांच्या ज्या अडचणी आहेत. त्या या अर्थसंकल्पामध्ये दूर कराव्यात, अशी विनंती करण्यात आली. यावेळी जितेश कब्बूर, अभय कुलकर्णी यांच्यासह कर सल्लागार उपस्थित होते.