आरटीओ खात्याचे दुर्लक्ष, मंजूर होऊनही नागरिकांना सुविधा नसल्याने संताप
प्रतिनिधी/ बेळगाव
सर्वच क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. वाहन चालविण्याचे परवाने मिळविण्यापूर्वी द्यावी लागणारी चाचणीही आता आधुनिक होणार आहे. यासाठीचा ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रक बेळगाव शहरासाठी मंजूर झाला होता. लवकरच विनातपासणी अधिकारी वाहन चालविण्याची चाचणी होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, बेळगावात अजून तरी हा ट्रक झाला नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे आधुनिकतेची कास दाखविणारे आरटीओ कार्यालय अशा प्रकल्पांकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
हा ट्रक ऑटोनगरमध्ये उपलब्ध होण्याची तयारी सुरू झाली होती. या ट्रकच्या खाली सेन्सर आणि कॅमेरे बसविले जातात. यामुळे वाहन चालविण्याची चाचणी घेताना संबंधित अधिकाऱयांना ट्रकवर उपस्थित राहण्याची गरज उरणार नाही. पण संबंधित चाचणीचे लाईव्ह व्हिडीओ किंवा रेकॉर्डेड प्रत ते पाहू शकणार आहेत. या ट्रकवर उमेदवार आपले वाहन घेऊन आल्यानंतर सेन्सरच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱयाला माहिती मिळत असते. वाहन चालविताना चुका झाल्यास तेही बीपच्या स्वरुपात कळणार आहे व उमेदवार कोठे चुकला याची माहिती संग्रहित करता येणार आहे. असा अत्याधुनिक टॅक बेळगावात होणार तरी कधी? असा सवाल उपस्थित होत आहे. हा ट्रक मंजूर झाला होता तर अजून का उभारण्यात आला नाही? यामध्ये काही घोळ तर झाला नाही ना? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
संबंधित माहितीच्या आधारावरच संबंधित ट्रकवर नोंदी होणार असून त्या अहवालावर एखाद्याला वाहन परवाना द्यावा की नाही, याचा निर्णय संबंधित अधिकाऱयांना घेण्याची मुभा होती. सध्या परवाना मिळविण्यासाठी चार प्रकारच्या चाचण्यांना सामोरे जावे लागते. शिकावू आणि कायमचा परवाना मिळविण्यासाठी या चाचण्या घेतल्या जातात. यासाठी शेकडो वाहनचालक दररोज उपस्थित असतात. या प्रत्येकाची चाचणी घेणे अवघड असल्याने काही वेळा गैरकारभारही होतात आणि वाहन चालविण्याच्या बाबतीत पूर्णपणे सक्षम नसणाऱयांनाही परवाने मिळतात. यासाठीच ही नवी पद्धत अंमलात आणण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला होता. मात्र, अजूनही तरी अशी सुविधा आरटीओ विभागात नसल्याचे दिसून येत आहे.
हे ट्रक निर्मितीचे काम वायव्य परिवहन महामंडळाला मिळण्याची शक्मयता आहे. असे ट्रक महामंडळाने बेंगळूर येथे तयार केले आहेत. महामंडळाच्या अभियंत्यांनी ट्रकखाली बसविण्यासाठीचे सेन्सर आणि कॅमेरे विकसित केले असून त्यासाठीचा आराखडा सादर करण्याची सूचना त्यांना करण्यात आली आहे. सर्व काही वेळेत झाल्यास बेळगाव हे या प्रकारचे हायटेक वाहन चाचणी केंद्र असणारे राज्यातील दुसरे ठिकाण असण्याचा मान मिळणार होता. मात्र, माशी कोठे शिंकली हे अजून तरी समजत नाही.
या प्रकल्पासाठी नियोजित आराखडय़ानुसार 6 कोटींचा खर्च अपेक्षित होता. ट्रकची निर्मिती, आवश्यक तंत्रज्ञानाची उभारणी आणि आवश्यक जागेची खरेदी यासाठी हा खर्च लागणार होता. ऑटोनगर येथे ही सर्व यंत्रणा विकसित करण्यासाठी किमान 5 एकर जमीन लागणार असून त्या संदर्भात कर्नाटक उद्योग विकास महामंडळाकडे करार करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. पाच-सहा वर्षांपूर्वी वाहतूक विभागाने कणबर्गीनजीक पाच एकर जागा घेण्याचे निश्चित केले होते. मात्र ती प्रक्रिया वेळेत झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे कर्नाटक उद्योग विकास महामंडळाने बुकींग करून वेळेत खरेदी न केल्याबद्दल लाखेंचा दंड वाहतूक विभागाला लावला असल्याची माहिती मिळाली आहे.
सुत्रांकडून उपलब्ध माहितीनुसार वाहतूक खात्याने अद्याप त्या जमिनीची किंमत दिलेली नाही. शिवाय दंडही भरलेला नाही. यामुळे प्रशासकीय विलंबाचा फटका या खरेदीवर बसला असल्याचे समजते. या संदर्भात बेळगावचे आरटीओ शिवानंद मगदूम यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.