कन्नड संघटनांचा फुसका बार : सर्व व्यवहार सुरळीत
प्रतिनिधी/ बेळगाव
मराठा विकास निगम स्थापण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे काही कन्नड दुराभिमान्यांनी त्याला जोरदार विरोध केला. मराठा आणि मराठीमधील अंतरच माहिती नसल्यामुळे कन्नड संघटनांचा सर्वच थरातून निषेध नोंदविण्यात आला होता. शनिवार दि. 5 डिसेंबर रोजी कन्नड संघटनांनी कर्नाटक बंदचे आवाहन केले होते. मात्र, बेळगावात त्याचा फज्जा उडाला असून सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. त्यामुळे कन्नड संघटनांची ही वल्गना म्हणजे फुसका बार ठरली आहे.
कर्नाटक बंदची हाक दिल्यानंतर कर्नाटकामधीलच अनेक संघटनांनी त्याला जोरदार विरोध केला. असे असताना सर्व थरातून आम्हाला पाठिंबा मिळत आहे म्हणून टिमकी वाजविली. मात्र प्रत्यक्षात सर्व व्यवहार सुरळीत असल्यामुळे कन्नड संघटनांचे हसे झाले आहे. बंदची वल्गना केल्यामुळे शहरामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याचबरोबर पोलिसांनीच कन्नड संघटनांना नोटीस दिल्यामुळे ते घरातून बाहेरही पडले नाहीत. त्यामुळे बेळगावात पूर्णपणे शांततेत आणि सुरळीत व्यवहार पार पाडले.
काही मोजक्मया कन्नड संघटना केवळ मराठी द्वेषापोटी बेळगाव जिह्याला वेठीस धरण्याचा प्रयत्न बऱयाच वेळा करत आहेत. मात्र, अशा संघटनांना पोलिसांनी दणका देणे गरजेचे आहे. शनिवारी ज्या प्रकारे संपूर्ण राज्यातून या कन्नड संघटनांचा निषेध करून दणका दिला आहे त्याच प्रकारे यापुढेही कन्नड संघटनांनी कोणत्याही प्रकारे बंद पुकारला तर जनतेने प्रतिसाद न देता आपले व्यवहार सुरळीत ठेवणे गरजेचे आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठेसह सर्व सरकारी कार्यालये आणि इतर व्यवसाय सुरळीत सुरू होते. बंदची थोडीशीही दखल कोणी घेतली नाही. त्यामुळे कन्नड संघटनांचे म्होरके तोंडघशी पडले. नेहमीप्रमाणे व्यवहार सुरू होते. शनिवार असल्यामुळे बाजारपेठेत रोजच्यापेक्षा जास्त गर्दी होती. सर्व बसेस व वाहने सुरू होती. त्यामुळे बंदचा फज्जा उडाला असून आता यापुढे तरी अशा प्रकारे जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न कन्नड संघटनांनी करू नये, अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत.