पोलीस, अग्निशामक, रुग्णवाहिकेसाठी आता एकच क्रमांक
प्रतिनिधी/ बेळगाव
पोलीस, अग्निशमन, रुग्णवाहिका आदी सेवांसाठी आता एकच क्रमांक अस्तित्वात आला आहे. बेळगावात रविवारी ‘डायल 112’ चा शुभारंभ करण्यात आला. यासाठी पंधरा विशेष वाहने तैनात करण्यात आली असून सांकेतिकरीत्या या वाहनांना हिरवा झेंडा दाखवून सेवेचा प्रारंभ करण्यात आला.
पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, गुन्हे तपास व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त चंद्रशेखर निलगार, आदींसह शहरातील पोलीस अधिकाऱयांच्या उपस्थितीत रविवारी सकाळी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. या सेवेचा शुभारंभ करण्यात आलेला बेळगाव हा राज्यातील सातवा जिल्हा आहे.
‘एक देश, एक मदत क्रमांक’ या संकल्पनेतून ही सेवा अस्तित्वात आली आहे. यापूर्वी पोलीस दलासाठी 100, रुग्णवाहिकेसाठी 108, अग्निशामक दलासाठी 101 क्रमांकावर संपर्क साधला जात होता. आता या सर्व सेवा 112 या एकाच क्रमांकावर उपलब्ध असणार आहेत. पूर्वीपेक्षा प्रभावीपणे यंत्रणा राबविण्यात येणार आहे.
या सेवेंतर्गत इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टीम (ईआरएसएस) बेळगाव पोलीस कंट्रोल रुममध्ये सुरू करण्यात आली आहे. 24 तास या विभागाचे कामकाज चालणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सेवा पुरविण्यात येणार आहे. एखाद्या अडचणीवेळी किमान पंधरा सेकंदमध्ये मदतीसाठी वाहने धावणार आहेत.
बेळगावसाठी पंधरा होयसळ वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून जीपीएस व मोबाईल डाटा टर्मिनल आदी तंत्रज्ञान या वाहनात उपलब्ध आहे. त्यांना आपत्कालीन सेवेसाठी आवश्यक प्रशिक्षण व साधनसुविधा पुरविण्यात आल्या असून बेळगावकरांनी या सेवेचा सदुपयोग घ्यावा, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.