रुग्णसंख्या वाढली तरी बरे होणाऱयांचे प्रमाणही अधिक
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर व जिल्हय़ात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. रविवारी आणखी आठ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 320 वर पोहोचली आहे. यापैकी 303 जण बरे झाले आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या 24 जणांपैकी दोघा जणांना आयसीयुमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
कोरोनामुळे अस्वस्थ बनत चाललेल्या बाधितांची संख्या वाढत चालली आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण राज्यात आयसीयुमध्ये उपचार घेणाऱया बाधितांची संख्या 200 च्या घरात आहे. यामध्ये बेंगळूर शहरातील 125 जणांचा समावेश आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या 24 जणांपैकी दोघा जणांना आयसीयुमध्ये ठेवावे लागले आहे. मात्र, व्हेंटिलेटरऐवजी ऑक्सिजनचा वापर करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत असून यामध्ये एकाची प्रकृती सुधारली आहे. बिम्सचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश दंडगी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
सिव्हिल हॉस्पिटलमधील आयसीयुमध्ये पंधरा व्हेंटिलेटरची व्यवस्था आहे. कोरोनाबाधितांपैकी ज्यांना श्वसनाचा त्रास उद्भवतो, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी व्हेंटिलेटरची गरज आहे. आजवर त्याचा वापर झाला नाही. सिव्हिलमध्ये 15 व्हेंटिलेटर आहेत.
पूर्वी लहान सिलिंडरमधून ऑक्सिजन पुरवठा केला जात होता. आता त्यासाठी प्रसूती विभागाशेजारी मोठा सिलिंडर उभारण्यात आला असून तेथून वॉर्डना ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. जिल्हय़ातील कोरोनाबाधितांचे बरे होण्याचे प्रमाण उत्तम आहे. मात्र, अद्याप 2 हजार 824 जणांचे अहवाल यायचे पाहिजे. याबरोबरच 14 दिवसांच्या क्वारंटाईनमधील चाकरमान्यांची संख्या दहा हजाराच्या घरात आहे. त्यांचीही स्वॅब तपासणी होणार आहे. त्यामुळे साहजिकच जिल्हय़ातील बाधितांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
त्यामुळे व्हेंटिलेटर बेडची गरज एक-दोन महिन्यात वाढणार आहे. सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये केवळ पंधरा व्हेंटिलेटरची व्यवस्था आहे. ही बेळगावची स्थिती. तर राजधानी बेंगळूरमधील परिस्थिती वेगळी आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱयांवर अंत्यक्रिया करण्यासाठी राजधानीत जागा मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकार पर्यायी स्मशानाच्या शोधात आहे.