दोन विणकरांचा समावेश : आजार-कर्जाला कंटाळून संपविले जीवन
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर व तालुक्मयात बुधवारी एका दिवसांत दोघा विणकरांसह चौघा जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आजार व कर्जाला कंटाळून त्यांनी आपले जीवन संपविले आहे. आत्महत्यांच्या मालिकेने शहरात खळबळ माजली आहे.
मलप्रभानगर- वडगाव, लक्ष्मीनगर-वडगाव येथील दोघा विणकरांनी आत्महत्या केली आहे. तर पोटदुखीला कंटाळून समर्थनगर येथील एका तरुणाने आपले जीवन संपविले आहे. आजाराला कंटाळून भाग्यनगर येथील एका वाहनचालकाने देसूर येथे गळफास घेऊन जीवन संपविले आहे.
शिवाजी गल्ली, लक्ष्मीनगर-वडगाव येथील गणपती रामचंद्र बुचडी (वय 65) या वृद्ध विणकराने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. दारूचे व्यसन व मानसिक अवस्थपणातून त्याने आपले जीवन संपविल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. बुधवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. शहापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
मलप्रभानगर-वडगाव येथील गोपाल जोतिबा संगमण्णावर (वय 40) या विणकराने राहत्या घरी जीन्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बुधवारी दुपारी ही घटना उघडकीस आली आहे. कर्जबाजारीपणा व पत्नी माहेरी गेल्याच्या मनस्तापातून त्याने आपले जीवन संपविल्याचे पोलिसांनी सांगितले. शहापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
तिसरी घटना समर्थनगर, पाचवा क्रॉस परिसरात घडली आहे. प्रवीण भाऊसाहेब माने (वय 29) या तरुणाने पोटदुखीच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मार्केट पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. तर आजाराला कंटाळून व्यवसायाने वाहनचालक असणाऱया राजू विठ्ठल हदगल (वय 48, रा. भाग्यनगर) याने देसूर येथे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.