महिला मूळची संकेश्वरची : वडिलांपासून संक्रमण झाल्याची माहिती : लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी
आजपासून औषध दुकानेही बंद : रस्त्यावर शुकशुकाट
प्रतिनिधी/ संकेश्वर
गेल्या दोन दिवसात बेळगाव जिल्हय़ात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नव्हता. यामुळे प्रशासनासह नागरिकांनाही थोडा दिलासा मिळाला होता. मात्र मंगळवारी सायंकाळी राज्य आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटीनमध्ये संकेश्वर येथील एका 25 वषीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. संकेश्वर येथे मागील गुरुवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने या महिलेस लागण झाल्याचे कळविण्यात आले आहे. सदर महिला त्याची मुलगी असून तिचे वास्तव्य बेळगावातील आझाद गल्लीत आहे.
सदर महिलेला बांधा झाल्यामुळे मंगळवारी सायंकाळी आझाद गल्ली परिसर सिलडाऊन करण्यात आला आहे. ही माहिती प्रसिद्ध होताच बेळगाव शहरात खळबळ माजली आहे. मंगळवारी सायंकाळी या महिलेस लागण झाल्याची माहिती प्रसिद्ध झाल्याने जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 43 वर पोहोचली आहे. तर मंगळवारी जिल्हय़ातील दोघा जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी परत पाठविण्यात आले आहे.
संकेश्वरात बुधवारपासून सीलडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच चालू असलेली औषधे दुकानेही गुरुवारपासून बंद करण्यात येणार आहेत. ज्यांना औषध हवे आहे त्यांनी प्रशासनाने दिलेल्या मोबाईल क्रमांकाशी संपर्क साधून औषधे मिळवावीत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
सदर बाधीत मुलगी संकेश्वरची असून ती बेळगाव येथे सासरी रहाते. तिचे वडील तबलिगच्या कार्यक्रमानंतर संकेश्वरला आले असताना संकेश्वर येथे चार दिवस थांबून पुन्हा ती सासरी गेली होती. संकेश्वरातील त्या पॉझिटिव्ह व्यक्तीचा कुणा-कुणाशी संपर्क आला याविषयी माहिती घेतली असता आपली मुलगीही भेटण्यास आली होती, अशी कबुली त्या व्यक्तीने दिल्यानंतर बेळगाव आरोग्य विभागाने सदर मुलगीलाही ताब्यात घेऊन तिचा स्वॅब तपासणीला दिला होता. मंगळवारी दुपारी स्वबच्या अहवालात तीही पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. तथापि कुटुंबातील आणखी कांही जणांचा स्वॅब अहवाल आलेला नाही.
दरम्यान शहरातील भाजीपाला आणि किराणा दुकाने बंद आहेत. यामुळे भाजीपाला किवा किराणा वस्तूसाठी नागरिक परवानाधारक दुकानदारांची मदत घेताना घरपोच सेवा मिळवत आहेत. नगर परिषदेने राबविलेल्या उपक्रमाचा नागरिकांना लाभ मिळत आहे. याबरोबरच शहरातील बँका आणि रुग्णालये सुरू आहेत. याबरोबरच शहरातील चौकाचौकात पोलीस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला असून शहरात मुख्य मार्गावर नाकाबंदी करून शहर आणि आजूबाजूच्या खेडय़ांचा संपर्क पूर्णपणे बंद केला आहे.
तापमानात वाढ
गेल्या दोन दिवसात तापमानात मोठी वाढ झाली आहे. संकेश्वरचे तापमान 38 अंशावर पोहचल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. कासावीस झालेल्या नागरिकांना शीतपेये किवा थंड पदार्थाचा आस्वाद घ्यावयाचा आहे. मात्र लॉकडाऊनमुळे सर्व दुकाने बंद आहेत. तसेच कोरोना विषाणूच्या धास्तीने नागरिक थंड पदार्थ घेणे टाळत आहेत.
दोघे डॉक्टर क्वारंटाईन
संकेश्वर शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर सीलडाऊन करण्यात आले आहे. यातच येथील दोघा खासगी डॉक्टरांना खबरदारी म्हणून क्वारंटाईन करण्यात आल्याचे समजते. यापैकी एका डॉक्टराला होमक्वारंटाईन तर दुसऱयाला क्वारंटाईन करण्यात आले आहे. यामुळे शहरवासीयांमध्ये पुन्हा भीती निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सदर डॉक्टरांनी लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा देताना अनेक रुग्णांच्या संपर्कात आल्याने खबरदारी म्हणून क्वारंटाईन करण्यात आल्याचे समजते.