प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरांत कोरोनाचा कहर वाढतो आहे. रोज 1 हजारांहून अधिक बाधित आढळून येत आहेत. कोरोना महामारी थोपविण्यासाठी शासकीय नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी रस्त्यांवर उतरलेले पोलीसही त्याला अपवाद नाहीत. 72 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.
सध्या गुन्हेगारी प्रकरणांचा तपास, नवीन प्रकरणे यासाठी पोलिसांचा वेळ खर्ची पडत नाही. कारण अधिकाऱयांपासून सामान्य पोलिसांपर्यंत प्रत्येक जण रस्त्यांवर आहेत. लॉकडाऊन नियमांचे पालन करण्यासाठी ही यंत्रणा दिवसरात्र झटत आहे. लॉकडाऊनमुळे साहजीकच पोलीस स्थानकाला येणाऱयांची संख्याही कमी झाली आहे.
उपलब्ध माहितीनुसार बेळगाव शहरातील वेगवेगळय़ा पोलीस स्थानकात सेवा बजाविणारे 72 पोलीस व दोन होमगार्डना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 45 पोलीस, अधिकारी व एक होमगार्ड कोरोनामुक्त झाला असून औषधोपचारानंतर बरे होऊन ते पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत. आणखी 25 पोलीस व एक होमगार्ड घरीच उपचार घेत आहे.
यासंबंधी कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्याशी संपर्क साधला असता 72 पोलीस व दोन होमगार्डना कोरोनाची लागण झाली आहे. बाधितांवर त्यांच्या घरीच उपचार घेण्यात येत आहेत. पोलिसांना लस दिल्यामुळे त्यांच्या प्रकृतीत झपाटय़ाने सुधारणा दिसून येत आहे. यापैकी 45 हून अधिक जण कामावर रुजू झाले आहेत, असे त्यांनी सांगितले.