बेळगाव / प्रतिनिधी
मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असणारी बेळगाव- इंदूर विमानसेवा सोमवार दि. 20 पासून सुरू होणार आहे. स्टार एअर बेळगावमधून चौथ्या शहराला जोडणारी सेवा सुरू करीत आहे. नुकत्याच सुरू झालेल्या तिरूपती, म्हैसूर व हैद्राबाद सेवेनंतर लगेचच इंदूर सेवा सुरू करण्यात येत असल्यामुळे बेळगावच्या प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.
स्टार एअरने अनेक दिवसांपूर्वी ही सेवा सुरु असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार 13 जानेवारीपासून या विमानाचे बुकींगही सुरू करण्यात आले. त्यामुळे बेळगावच्या नागरिकांना थेट प्रवास करणे सोपे होणार आहे. इंदूर शहरातील होळकरांचा वाडा पाहण्याची संधी अवघ्या काही तासांमध्ये मिळणार आहे. त्यामुळे या विमानसेवेबद्दल बेळगावकर नागरिकांच्या मनात उत्सुकता आहे.
स्टार एअरने बेळगावमधून आपली सेवा सुरू केल्यानंतर बेळगावमध्ये प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली. स्टारने पहिले बेंगळूर व मुंबई या महत्त्वाच्या शहरांना जोडले. त्यानंतर अहमदाबाद या व्यापारीपेठेलाही जोडण्यात आले. आता इंदूर शहराला विमानसेवा सुरू करण्यात येणार असल्यामुळे स्टार आता 4 थ्या शहराला जोडणार आहे.
अशी असणार विमानसेवा
आठवडय़ात तीनवेळा ही विमानसेवा असणार आहे. सोमवार, मंगळवार व गुरूवारी ही सेवा देण्यात येणार आहे. बेळगावमधून दुपारी 1. 10 हे विमान उडाण घेऊन 2. 40 वा. इंदोरला पोहचणार आहे. तर दुपारी 3.10 मि. इंदोर येथून उडाण घेऊन 4. 45 मि. बेळगावला पोहचणार आहे.