प्रतिनिधी / बेळगाव
कार चोरीप्रकरणी बेळगाव व खानापूर येथील दोन तरुणांना रविवारी हुबळी येथे अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून एक कार जप्त करण्यात आली आहे. गोकुळ रोड पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
गोकुळ रोडचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱयांनी रविवारी दुपारी केए 53, एमए 3126 क्रमांकाची कार अडवून तपासणी केली. या कारमध्ये दोन तरुण होते. त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी करण्यात आली. मात्र, त्यांनी समर्पक उत्तरे दिली नाहीत व कागदपत्रेही हजर केली नाहीत.
तन्वीर कासीमसाब सय्यद (वय 20) रा. वैभवनगर, जनता प्लॉट, तंजीम इस्माईल खानापुरी (वय 31) मूळचा खानापूर, सध्या राहणार पणजी-गोवा अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. त्यांनी कार चोरल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
सध्या हुबळी येथील गोकुळ रोड पोलीस स्थानकात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांनी यापूर्वी एपीएमसी पोलीस स्थानकात सेवा बजावली आहे. रविवारी अटक करण्यात आलेल्या दोन तरुणांनी काकती, खानापूर, नंदगड, टिळकवाडी व हावेरी शहर पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात गुन्हे केले असून गेली आठ ते दहा वर्षे न्यायालयालाही चकवत होते. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.