प्रतिनिधी/बेळगाव
कोरोनाच्या धोक्मयामुळे मागील सहा महिन्यांपासून बंद असलेल्या कर्नाटक- महाराष्ट्र बससेवेला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राने अडवणूक केली मात्र अखेर बेळगाव आणि चिकोडी डेपोच्या बसेसना महाराष्ट्रात प्रवेश देण्यात आला. इतर डेपोंच्या गाडय़ांना मात्र प्रवेश देण्यास महाराष्ट्र सरकारने नकार दिला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून कर्नाटकात अद्याप बससेवा सुरू झालेली नाही.
कर्नाटक सरकारने आंतरराज्य बससेवेस परवानगी दिल्यानंतर राज्य परिवहन महामंडळ आणि वायव्य कर्नाटक परिवहनने महाराष्ट्रात जाणारी बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. सकाळपासूनच कोल्हापूर, पुणे, मुंबई आणि कोकण या मार्गांवरील प्रवासी संख्या अभ्यासून बसेस सोडण्यात येत होत्या. दरम्यान, या सर्व बसेस राज्यांच्या सीमेवर अडविण्यात आल्या. निपाणी येथेही अनेक गाडय़ांची अडवणूक महाराष्ट्राने केल्याची बाब समोर आली.
कोविडचा प्रसार होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात येत होती. दरम्यान, प्रशासकीय पातळीवर चर्चा झाल्यानंतर महाराष्ट्राने बेळगाव आणि चिकोडी डेपोकडून येणाऱया बसेसना प्रवेश दिला. त्यानंतर कोल्हापूरमार्गे पुढे आणि कोकण विभागात जाणाऱया गाडय़ा रवाना झाल्या आहेत, अशी माहिती वायव्य परिवहनच्या बेळगाव विभागातून उपलब्ध झाली आहे.
महाराष्ट्राची एसटी अर्थात लालपरी अद्याप कर्नाटकात दाखल होऊ शकलेली नाही, अशी माहितीही उपलब्ध झाली आहे. कर्नाटकातील हुबळी व इतर डेपोंच्या गाडय़ांना महाराष्ट्रात यापुढे कधी प्रवेश दिला जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.