बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी जाहीर केले आहे की, नव्याने स्थापन झालेल्या कर्नाटक मंत्रिमंडळात आज भाजपचे एकूण २९ आमदार मंत्री म्हणून शपथ घेतील. दरम्यान, मुख्यमंत्री बोम्माईंच्या नवीन मंत्रिमंडळात बेळगाव जिल्ह्यातील दोन आमदारांचा समावेश करण्यात आला आहे. माजी मंत्री शशिकला जोल्ले आणि उमेश कत्ती यांची नवीन मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे.
दरम्यान, बेंगळूर येथे माध्यमांशी बोलताना बोम्माईंनी एकूण २९ मंत्री आज दुपारी राजभवन येथे होणाऱ्या सोहळ्यात शपथ घेतील. तसेच त्यांनी नवीन मंत्रिमंडळाची यादी तयार आहे आणि ती राजभवनाला पाठवण्यात आली आहे. यामध्ये ओबीसी प्रवर्गातील ७, एससीचे ३, एसटीचे १, वोक्कलिगा समाजातील ७, लिंगायत समुदायाचे ८ आणि मंत्रिमंडळात १ महिलेचा समावेश असेल, असे त्यांनी सांगितले होते.