महिलेसह चौघे जण दगावले, फैलाव वाढताच
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर व जिलह्यात कोरोनाचा फैलाव वाढत चालला आहे. शुक्रवारी 184 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून महिलेंसह चौघे जण दगावले आहेत. बाधितांमध्ये बेळगाव तालुक्यातील 90 जणांचा समावेश आहे. पोलीस लष्करी जवानांनाही लागण सुरुच आहे. जिह्यातील एकूण बाधितांचा आकडा 21 हजार पार झाला आहे.
बेळगाव शहर व उपनगरांतील 68 व ग्रामीण भागातील 22 असे एकूण बेळगाव तालुक्यातील 90 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जेएलविंगमधील 10, आयटीबीपीचे 1 व पोलीस हेडक्वॉर्टर्समधील 4 पोलिसांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर सरकारी माहितीनुसार जिह्यातील मृतांचा आकडा 315 वर पोहोचला आहे.
बहुतेक जणांना लक्षणे नाहीत. असे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले. बैलहोंगल, बेळगाव, खानापूर, चिकोडी येथील चौघा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झला आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. शुक्रवारी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱयांनाही लागण झाली आहे. गेल्या आठवडय़ाभरात डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे.
हिंदवाडी, खासबाग, कोनवाळ गल्ली, महाव्दार रोड, नाझरकॅम्प-वडगाव, मुजावर गल्ली, नेहरुनगर, रामतीर्थनगर, शिवबसवनगर, शिवाजीनगर, शहापूर, श्रीनगर, टिळकवाडी, विनायकनगर, विजयनगर, काकती, गणेशपूर, हिंडलगा, होनगा, कुदेमनी, धामणे, पिरनवाडी, सावगांव, सोनोली, अनगोळ, भाग्यनगर, खासबाग, कॅम्प, चव्हाट गल्ली, बसवणकुडची, व्दारकानगर-टिळकवाडी, हनुमानगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्हा सर्व्हेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 21 हजार 29 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 19 हजार 11 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 1 हजार 703 सक्रिय रुग्णांवर वेगवेगळय़ा इस्पितळांत उपचार करण्यात येत आहेत. आणखी 5 हजार 538 जणांचा अहवाल यायचा आहे.
दहा दिवसानंतर जिल्ह्याचा अहवाल
आरोग्य विभागाने शुक्रवारी रात्री हेल्थ बुलेटीन जारी केले आहे. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून जिल्हा बुलेटीन बंद झाले होते. राज्य आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या हेल्थबुलेटीनमध्येही आता सातत्य राहिले नाही. एकंदर परिस्थिती लक्षात घेता आरोग्य विभागाला आता कोरोनाचे गांभीर्य नाही, हे दिसून येते.