गोकाक येथील रहिवाशाचा मृत्यू, 44 जण झाले कोरोनामुक्त
प्रतिनिधी / बेळगाव
सोमवारी बेळगाव शहर व जिह्यातील 38 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रोज सुमारे दोन ते अडीच हजार जणांची स्वॅब तपासणी केली जात आहे. यामध्ये 38 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. गोकाक येथील एका रहिवाशाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृतांचा सरकारी आकडा 334 वर पोहोचला आहे.
बेळगाव शहर व उपनगरांतील 17 व ग्रामीण भागातील 3 असे बेळगाव तालुक्यातील 20 जणांचा यामध्ये समावेश आहे. एकूण बाधितांचा आकडा 24 हजार 750 वर पोहोचला असून यापैकी 23 हजार 894 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.
सध्या जिह्यात 519 सक्रिय रुग्ण आहेत. तर 1 हजार 907 जणांचा स्वॅब तपासणी अहवाल यायचा आहे. जिह्यात अद्याप 25 हजार 971 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. आतापर्यंत 2 लाख 23 हजार 884 जणांची स्वॅब तपासणी झाली असून 1 लाख 95 हजार 888 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
सोमवारी गणेशपूर, माविनकट्टी, अनगोळ, जाधवनगर, खडेबाजार, महांतेशनगर, सदाशिवनगर, श्रीनगर, वडगाव परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. एका सदाशिवनगर परिसरातील सहा जणांचा यामध्ये समावेश आहे. हिवाळय़ात रुग्ण संख्या वाढणार अशी भिती व्यक्त करण्यात येत असून त्यामुळे प्रत्येकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.