आता तिरुपतीसाठी दोन विमाने उपलब्ध
प्रतिनिधी /बेळगाव
उडान-3 अंतर्गत मंजूर असणाऱया स्टार एअरच्या बेळगाव-तिरुपती या विमानफेरीचा सोमवारी शुभारंभ झाला. यामुळे आता बेळगावमधून तिरुपतीला जाण्यासाठी दोन विमाने प्रवाशांना उपलब्ध झाली आहेत. या विमानफेरीचा शुभारंभ खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते झाला. पहिल्या प्रवाशाला मंगला अंगडी यांच्या हस्ते तिकीट देण्यात आले.
बेळगाव जिल्हय़ासह आसपासच्या परिसरामध्ये तिरुपती येथील बालाजीचे अनेक भक्त आहेत. त्यामुळे दररोज शेकडो भाविक रेल्वे व विमानाने तिरुपती येथे प्रवास करीत असतात. यापूर्वी ट्रू जेटने जानेवारी 2020 मध्ये बेळगाव-तिरुपती विमानफेरी सुरू केली होती. आता स्टार एअरनेही या मार्गावर विमानफेरी सुरू केल्याने प्रवाशांना सोयीचे होणार आहे. बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. सोमवार व बुधवार असे दोन दिवस विमानसेवा असून सकाळी 11.55 वा. तिरुपती येथून निघालेले विमान 12.55 वा. बेळगावला तर दुपारी 1.20 वा. बेळगाव येथून निघालेले विमान 2.25 वा. तिरुपतीला पोहोचणार आहे.
यावेळी केएलएस गोगटे कॉलेजच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन एम. आर. कुलकर्णी, कीर्ती सुरंजन, विमानतळाचे कर्मचारी पी. एस. देसाई, सुधाकर नाईक मोहिनी शेखर, शा सराथ, ब्रह्मानंद रेड्डी, किरण सुतार, रकीब शरिफ यांच्यासह इतर उपस्थित होते.