तिरुपती येथे कोरोना रुग्णांची वाढती संख्या : ट्रू जेटची खबरदारी
प्रतिनिधी/ बेळगाव
तिरुपती येथील तिरुमल्ला तिरुपती देवस्थानला दर्शनासाठी जाणाऱया भाविकांची संख्या मोठी आहे. बेळगाव परिसरात बालाजीचे लाखो भक्त असल्यामुळे बेळगावमधून जाणाऱया प्रवाशांची संख्या अधिक आहे. परंतु विमानाने तिरुमलाच्या दर्शनाला जाणाऱया भाविकांना आता काही वेळ वाट पाहावी लागणार आहे. कारण तिरुपती येथील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे बेळगाव-तिरुपती ही विमानसेवा ट्रू जेट कंपनीने लांबणीवर टाकली आहे. त्यामुळे पुढील आदेश आल्यानंतरच तिरुपती विमानसेवा पूर्ववत केली जाणार आहे.
बेळगावमधून ट्रूजेट या विमान कंपनीने वर्षभरापूर्वी तिरुपती सेवा सुरू केली. या विमानसेवेला बेळगावमधील बालाजी भक्तांनी भरघोस प्रतिसाद दिला. यामुळे तिकीट बुकींगसाठी काही महिने वाट पाहावी लागत होती. बेळगावमधून तिरुपतीला रेल्वे सेवाही उपलब्ध आहे. यामुळे हजारो भक्त तिरुपतीच्या दर्शनाला जात असतात.
लॉकडाऊनमुळे रेल्वे व विमानसेवा बंद करण्यात आल्या. लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर हळूहळू विमानसेवा सुरू करण्यात आली. परंतु अद्याप बेळगाव-तिरुपती ही विमानसेवा सुरू करण्यात आलेली नाही. मध्यंतरी ट्रूजेट कंपनीने ही विमानसेवा सुरू करणार असल्याचे सांगितले होते. यासाठी जुलै 16 पासून बुकींगही सुरू करण्यात आले होते. परंतु तिरुपती येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कंपनीने ही सेवा लांबणीवर टाकली आहे.