प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव थिएटर असोसिएशनचा 9 वा नाट्य महोत्सव नुकताच 31 जानेवारीला पार पडला. कोविड मुळे मूढ झालेल्या रंगभूमीला पुन्हा एकदा नव्याने स्फूर्ती मिळाली. यावेळी बेळगावच्या नाट्यरसिकांनी महोत्सवाला हाउसफुल प्रतिसाद देऊन आपल्या रंगभूमी प्रती असलेल्या ओढीची प्रचिती आणून दिली.
या नाट्य महोत्सवात एकूण चार एकांकिका सादर करण्यात आल्या. नाट्य महोत्सवाची सुरुवात कै. अशोक विठ्ठल याळगी यांना अभिवादन करून करण्यात आली. या वेळी नाट्य रसिकांनी दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली.पुढे प्रशांत मणगुतकर यांनी बेळगाव थिएटर असोसिएशनच्या 9 वर्षांच्या वाटचाली बद्दल आणि उद्देशाबद्दल माहिती करून दिली.महोत्सवाची सुरुवात रविंद्र वाडकर लिखित धांडोळा या एकांकिकेने करण्यात आली. या एकांकिचे दिग्दर्शक अपेक्षा बिर्जे यांनी केलं होत. नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून त्याला सोडलेल्या एका स्त्री ची व्यथा एका पत्रकाराच्या लेखणीतून मांडण्यात आली. कल्याणी गजगेश्वर सचिन मांडेकर, कुणाल हिरोजी, नम्रता पुराणिक यांनी केलेल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाला व्याकूळ केलं.
पुढे टाळ्या व शिट्ट्यांच्या आवाजात सुरू झालेल्या “तुझं माझं जमेना” या एकांकिकेने प्रेक्षकांना पोट भरून हसवलं. प्रत्येक पात्राच्या अनपेक्षित प्रवेशाला हास्य कल्लोळ उठवत नाट्य पुढे सरसावले. नवरा बायकोच्या भांडणातील प्रेम दर्शवणारी एकांकिका भैरव भातकांडे यांनी दिग्दर्शित केली होती तर मोतीराम रांगणेकर यांनी लिहिली होती. अंकित जोशी, वैभवी जिनराल-जोशी, कुणाल हिरोजी, कपिल राजगोळकर, मानसी शिवणगेकर, अनुष्का पुजारी, प्रज्ञा शिवणगेकर यांच्या अभिनयाने आणि अचूक टायमिंगने प्रेक्षकांच्या टाळ्या लुटल्या.
मैत्रीत लपलेलं पहिलं गुलाबी प्रेम ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी एका खेळाच्या निमित्ताने खुलत जातं. पुढे कथानक खोडीत, मस्तीत प्रेक्षकांना खिळवून ठेवत. हृषिकेश तुराई लिखित व सुजित बिर्जे दिग्दर्शित या एकांकितेत ओमकार तमुचे आणि तेजस्विनी सोमसाळे यांनी अचूक अभिनय केला. विशेष म्हणजे या एकांकिकेत अक्षय कांबळे याचा मूक अभिनय विशेष कौतुकास पात्र ठरला
विजय तेंडुलकर लिखित ” मादी ” या एकांकिकेत मध्ये मंदा आणि मधूची लग्नाआधी एकांतात झालेली शेवटची भेट दर्शविणारे कथानक त्यात सुजित बिर्जेच दिग्दर्शन, प्रेक्षकांच्या मनाचे घाव घेत होते. मंदाच्या तोंडून नात्यात उरलेली शेवटची वाक्य, मधुला घायाळ करत उरलेली स्तब्धता आणि मंदा मधूच्या मिठीत विरत चाललेलं नात सोनम कातकर आणि शिवराज चव्हाण यांनी आपल्या अभिनयातून बखुबी साकारलं. एकही ब्लॅक आऊट नसताना सलग 45 मिनिट चाललेल्या गोष्टीने प्रेक्षकांना भाऊक केलं. नाटक संपल्यावर 10 सेकंद उशिरा आलेल्या टाळ्या सर्व काही सांगून गेल्या.
नाट्य महोत्सवातील चारही एकांकीकेंचे नेपथ्य संकेत लोहार, राजू लोहार यांनी केलं. तर संगीत संयोजन सचिन मांडेकर आणि प्रज्ञा शिवणगेकर यांनी केले. प्रकाश योजनेसाठी कपिल राजगोळकर आणि विनायक बलोगी यांनी केले.महोत्सवाच्या शेवटी या नाट्य चळवळीत सहभागी होण्यासाठी फेसबुकवरील बेळगाव थिएटर असोसिएशन पेज शी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.