आठवडय़ातून चार दिवस विमानफेरी सुरू झाल्याने समाधान : विमानफेरी दररोज सुरू करण्याची प्रवाशांची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
देशाची राजधानी दिल्ली शहराला आता बेळगावमधून आठवडय़ातील चार दिवस विमानफेरी सुरू करण्यात आली आहे. या विमानफेरीला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. गुरुवारी एकूण 356 प्रवाशांनी दिल्ली-बेळगाव-दिल्ली असा प्रवास केला. आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या असून यापुढे ही फेरी दररोज सुरू करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.
बेळगाव विमानतळावरून 13 ऑगस्टपासून दिल्ली-बेळगाव विमानफेरी सुरू झाली. देशाच्या राजधानीला विमान सुरू झाल्याने प्रवाशांमधून उत्तम प्रतिसाद मिळाला. याची दखल घेत स्पाईसजेट कंपनीने काही दिवसांमध्येच ही फेरी तीन दिवस केली. 149 आसन क्षमता असणारे विमान अपुरे पडू लागल्याने स्पाईस जेटने 189 आसन क्षमता असणारे विमान या मार्गावर सुरू केले. यामुळे प्रवाशांना प्रवास करणे सोयीचे ठरले.
प्रवाशांची संख्या वाढत असल्याने आठवडय़ातून चार दिवस दिल्ली विमानफेरी या आठवडय़ापासून सुरू करण्यात आली. सोमवार, मंगळवार, गुरुवार व शनिवार असे चार दिवस विमानफेरी सुरू केली आहे. अवघ्या अडीच तासात दिल्लीला पोहोचता येत असल्यामुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. गुरुवारी 182 प्रवासी दिल्लीवरून बेळगावला आले तर 174 प्रवासी बेळगावहून दिल्लीला गेले. आजवरची ही दिल्ली शहराला जाणाऱया प्रवाशांची सर्वाधिक संख्या होती.
दररोज विमान फेरीची मागणी बेळगाव हे शहर महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमेवर असल्यामुळे वाहतुकीसाठी सोयिस्कर ठरते. हुबळी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग येथून थेट दिल्लीला विमानफेरी उपलब्ध नसल्यामुळे बेळगावला प्राधान्य दिले जाते. दिल्ली ही देशाची राजधानी असल्यामुळे व्यावसायिक, राजकारणी यांची नेहमी ये-जा असते. यामुळे बेळगाव-दिल्ली विमानफेरी दररोज सुरू करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.