बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव-धारवाड या रेल्वेमार्गाच्या कामाला आता गती मिळणार आहे. रेल इंडिया टेक्निकल ऍन्ड इकॉनॉमिकल सर्व्हिस (राईट्स) कंपनीला कंत्राट मिळाले आहे. धारवाड रेल्वेमार्गासह इतर दोन मार्गांचे कंत्राट या कंपनीला मिळाले आहे. यामुळे काही दिवसांमध्ये भू-संपादनाच्या कामाला सुरुवात होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
राईट्स कंपनी भारतासह इतर 55 देशांमध्ये कार्यरत आहे. 47 वर्षे जुन्या असणाऱया या कंपनीने आजवर रेल्वे मंत्रालयाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत. या कंपनीला बेळगाव-धारवाडसह शिमोगा-राणेबेन्नूर, तुमकूर-दावणगेरे या कामांचेही कंत्राट मिळाले आहे. एकूण 4 हजार 27 कोटी रुपयांचे कंत्राट मिळाल्याची माहिती कंपनीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर या रेल्वेमार्गाला तत्कालिन रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या कार्यकाळात मंजुरी मिळाली होती. परंतु त्यानंतर कोरोनामुळे हा प्रकल्प रखडला होता. आता केंद्र व राज्य सरकारने या कामाला गती दिली असून कंत्राट देण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. राज्य सरकारही भू-संपादनासाठी प्रयत्नशील असल्याने लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.