रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांची माहिती,
प्रतिनिधी/ बेळगाव
नियोजित बेळगाव कित्तूरमार्गे धारवाड व शिमोगा ते राणेबेन्नूर या दोन्ही रेल्वेमार्गांच्या कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी जमीन संपादित केली जाणार आहे. या दोन्ही मार्गांमुळे कमी वेळेत रेल्वेचा प्रवास करता येणार आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी दिली.
शनिवारी मंत्री अंगडी यांनी बेळगावमधून शिमोगा येथील रेल्वेस्थानक व आतील पायाभूत सुविधांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले. शिमोगा-राणेबेन्नूर नवीन रेल्वे प्रकल्प राबविण्यासाठी अंदाजे 994 कोटी रुपये खर्च येणार आहे. यामध्ये राज्य सरकार 50 टक्के खर्च करणार असून मोफत जमीनही उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बेळगाववरून कित्तूरमार्गे धारवाड हा रेल्वेमार्ग अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या मार्गाला रेल्वे मंत्रालयाकडून मान्यता मिळाली असून लवकरच याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. यामुळे बेळगाव-धारवाड रेल्वेचा प्रवास कमी वेळात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.