आज 2 सामन्यांनी स्पर्धेला प्रारंभ
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित सहाव्या बेळगाव प्रीमियर लीग मोहन मोरे चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत 8 मालकी संघांनी भाग घेतला असून, 29 सामने खेळविले जाणार आहे. मालिकावीरास इलेक्ट्रिक दुचाकी वाहन बक्षिस असेल.
या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पुरस्कर्ते माजी जि. पं. शिक्षण स्थायी समितीचे अध्यक्ष मोहन मोरे, युनियन जिमखानाचे अध्यक्ष चंद्रकांत बांडगी, प्रसंन्ना सुंठणकर, संजय मोरे, संजय चव्हाण, सुहास कुलकर्णी, संघ मालक रोहित पोरवाल, संजय सातेरी, सुदीप सातेरी, प्रकाश पाटील, निशिल पोतदार, प्रणय शेट्टी, चंदन कुंदरनाड, विठ्ठल गवस, गजानन जैनोजी, कृष्णा जैनोजी व प्रसाद मोरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत चंद्रकांत बांडगी यांनी केले. स्पर्धेतील चषकांचे अनावरण करण्यात आले. सर्व चषके शंकर खासनीस व प्रशांत खासनीस यांनी पुरस्कृत केले आहे. मालिकावीरासाठी इलेक्ट्रिक दुचाकी मारूती चौगुले, के. एन. कावीलकर यांनी पुरस्कृत केली. दुचाकी वाहनाचे अनावरण करण्यात आले. चेतन बैलूर यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले. परशराम पाटील, महांतेश देसाई, मिलिंद चव्हाण व सर्व संघातील खेळाडू उपस्थित होते.
शनिवारी उद्घाटनाचे सामने सुपर एक्स्प्रेस युनियन जिमखाना वि. स्पोर्ट्स ऑन सकाळी 9 वा. तर दुसरा सामना मोहन मोरे वि. एसेस डेव्हलपर्स सीसीआय यांच्यात दुपारी 1 वा. खेळविण्यात येणार आहे.