प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावच्या रेल्वे स्थानकाचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. मिरज-लोंढा दुपदरीकरण यांजनेंतर्गत 170 कोटी रुपये खर्चुन रेल्वे स्थानकाचे प्रवेशद्वार व कोचिंग टर्मिनल उभारण्यात येणार आहे. मार्च-2022 पर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती नैर्त्रुत्य रेल्वेचे सर व्यवस्थापक ए. के. सिंग यांनी दिली.
नुकतीच त्यांनी बेळगाव रेल्वे स्थानकाला भेट देऊन विकासकामांचा आढावा घेतला. कोरोनामुळे कामाची गती मंदावली होती. आता पुन्हा वेगाने या कामाला सुरुवात झाली आहे. दक्षिण प्रवेशद्वाराचे काम देखील प्रगतीपथावर असून एक हायटेक रेल्वेस्थानक बनविण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. दिवंगत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या संकल्पनेनुसार राणी चन्नम्मा यांच्या किल्ल्याप्रमाणे या रेल्वे स्थानकाचा विकास होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी हुबळी विभागीय व्यवस्थापक अरविंद मालखेडे उपस्थित होते.