प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाचे संकट दूर होताच अर्थव्यवस्थेने पुन्हा एकदा उभारी घेतली आहे. केंद्रीय जीएसटी कार्यालय बेळगाव विभागाने 2021-22 या आर्थिक वर्षात 10 हजार 172 कोटी रूपयांचा महसूल जमा केला आहे. बेळगाव विभागात बेळगाव जिल्हय़ासह धारवाड, गदग, कोप्पळ, विजयनगर, बेळ्ळारी, रायचूर, यादगीर, गुलबर्गा, बिदर, विजापूर व बागलकोट यांचा समावेश होता. यावषी सर्वाधिक महसूल जमा झाला असून ग्राहक संख्येच्या तुलनेत महसूल जास्त आहे.
बेळगाव विभागात 2 लाख 30 हजार 566 जीएसटी अंतर्गत करदाते आहेत. हे करदाते राज्य अथवा केंदीय जीएसटी अंतर्गत महसूल जमा करत असतात. 2019-20 या आर्थिक वर्षात 7 हजार 677 कोटी तर 2020-21 या आर्थिक वर्षात 7 हजार 124 कोटी रूपये महसूल जमा झाला होता. यावर्षी हा महसूल 10 हजार कोटी रूपयांवर पोहोचला आहे. मागील वषी पेक्षा 43 टक्के अधिक महसूल जीएसटी विभागाकडे जमा झाला आहे. बेळगाव विभागात स्टील, सिमेंट, मायनिंग, साखर यासारखे उद्योग यामध्ये जेएसडब्लू स्टील, केसोराम इंडस्ट्रिज, ओरिएंट इंडस्ट्रिज, एनएमडीसी यासह इतर मोठे उद्योग आहेत.
महसूल वाढीसाठी बेळगाव जीएसटी विभागाने अनेक उपक्रम हाती घेतले. उद्योजक, व्यवसायिक यांच्या समस्यांचे निराकरण केल्यामुळे महसूल वाढ झाली आहे. जीएसटी विभागाने कर चुकविणाऱयांवर कठोर कारवाई केली आहे. सप्टेंबर 2021 मध्ये ई-वे बिल विना 7 कोटी रूपयांची वाहतूक केली जाणारी सुपारी जप्त केली होती. एकूण 101 घटनांमध्ये 503 कोटी रूपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. जीएसटी आयुक्त बसवराज नलगावे यांनी सर्व व्यापारी संघटनांना वेळच्यावेळी जीएसटी जमा करण्याचे आवाहन केले आहे.