वार्ताहर / उचगाव
बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील उचगावनजीक बेळगुंदी फाटय़ाजवळ भरधाव ट्रकवरील चालकाचा ताबा सुटून ट्रक थेट एका फार्म हाऊसच्या आवारात घुसला आणि रस्त्याशेजारी असलेला विद्युतभारित खांब, तारा सर्वच सपाट करून पलटी झाला. रात्रीच्या वेळी रहदारी नसल्याने मोठा अनर्थ टळला. सदर घटना बुधवारी रात्री दोनच्या सुमारास घडली. यानंतर संपूर्ण रात्र व गुरुवारी दिवसभर विद्युत पुरवठा उचगाव परिसरात खंडित झाला होता.
बेळगाव-राकसकोपमार्गे बेळगाव-वेंगुर्ला मार्गाकडे येणारा बॉक्साईटचा ट्रक (क्र. एपी 39/टीएस 5787) रात्री दोनच्या सुमारास भरधाव खाली आला. या ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक चालकाने थेट रस्त्याच्या शेजारी असलेल्या एका फार्म हाऊसच्या आवारात घातला. रस्त्याच्या शेजारी उचगाव परिसरात विद्युत पुरवठा करणारी मुख्य लाईन आहे. या खांबावर सदर ट्रक आदळला आणि विद्युत तारा तुटून लोंबकळू लागल्या. सदर ट्रक इतका वेगात होता की ताबा सुटून तो पलटी झाला. ट्रक चालकाचे नशीब बलवत्तर म्हणून विद्युतभारित तारांचा स्पर्श होऊनदेखील तो बाल बाल बचावला. त्याने घटनास्थळावरून पलायन केले.
बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर सातत्याने रहदारी मोठय़ा प्रमाणात असते. मात्र, रात्री दोनच्या वेळी रहदारी कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. विद्युतभारित खांबाला ट्रक आदळून विद्युत तारा तुटल्या. त्यामुळे रात्री दोन वाजल्यापासून या भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. गुरुवारी सकाळपासून उचगाव विभाग हेस्कॉमच्या कर्मचाऱयांनी तुटलेला खांब व विद्युत तारा जोडण्यात अख्खा दिवस घालविला. परिणामी विजेवर अवलंबून असणाऱया अनेक व्यावसायिक आणि घरगुती कामांमध्ये व्यत्यय निर्माण झाला होता.
सदर ट्रकचालकावर कारवाई करून दंड ठोठावावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. त्याच्या बेजबाबदार ट्रक चालवण्यामुळे नागरिकांना वीज पुरवठय़ापासून अलिप्तच राहावे लागले. त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.