प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव-वेंगुर्ला महामार्गावरील हिंडलगा ग्राम पंचायत हद्दीमधील रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात कचरा फेकण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना याचा फटका बसत आहे. ग्राम पंचायतीने त्यांना ताकीद देऊनही त्या ठिकाणी चिकन, मटण व दारू दुकानदार कचरा फेकत असल्याचे उघडकीस येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
वारंवार सांगूनही येथे कचरा फेकण्यात येत आहे. ग्राम पंचायतीच्यावतीने येथील कचरा काढण्यात येत असला तरी संबंधितांनी याकडे साफ दुर्लक्ष करून ग्राम पंचायतीच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावत आहेत. त्यामुळे याकडे आता गांभीर्याने लक्ष देऊन संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावरून मोठय़ा प्रमाणात वाहतूक होते. हा कचरा रस्त्यावरच फेकण्यात येत असल्याने समस्या निर्माण होत आहे. त्यातच चिकन आणि मटण दुकानांतून कचरा फेकण्यात येत असल्याने भटकी कुत्री या ठिकाणी झुंबड करत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यामुळे याकडे आता गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
महानगरपालिकेला सांगून या ठिकाणचा कचरा काढण्यात आला. मात्र पुन्हा या ठिकाणी कचरा फेकत असल्याने समस्या निर्माण होत आहे. याबाबत ग्राम पंचायतींने संबंधितांना वारंवार कचरा न टाकण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र संबंधितांनी याकडे कानाडोळा करून पुन: पुन्हा कचरा टाकण्यात धन्यता मानली आहे..