तीन लाख रुपयांचे नुकसान : अज्ञातांकडून कृत्य, कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याची मागणी
वार्ताहर / उचगाव
मध्यरात्री अज्ञातांनी गॅरेजला आग लावल्याने आगीत तीन लाखांचे नुकसान झाल्याची घटना बेळगाव-वेंगुर्ला रोडवरील बेळगुंदी संपर्क रस्त्याजवळ घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या आठ वर्षांपासून बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावर बेळगुंदी संपर्क रस्त्याशेजारी असलेल्या इराण्णा उसण्णाप्पा इलगार यांच्या गॅरेजला मंगळवारी रात्री अज्ञात इसमांनी आग लावल्याने आगीमध्ये तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.आगीमध्ये त्यांचे पूर्ण साहित्य जळून खाक झाले. शेजारी बांधलेला जर्मन शेफर्ड जातीचा कुत्राही आगीत जळून मृत्युमुखी पडला.
मध्यरात्री कुत्रा ओरडत असल्याचा व फ्रान्सालियम आश्रम शेजारी असलेल्यांना आगीचे लोळ दिसले. सुळगा-हिंडलगा येथे मुक्काम असलेल्या इराण्णा यांनी तात्काळ गॅरेजकडे धाव घेतली. तेव्हा आगीने रौद्ररुप धारण केले होते. आगीमध्ये पूर्ण साहित्य जळून खाक झाले होते. त्यांनी लागलीच अग्निशमन दलाला पाचारण केले. मात्र, पाण्याची गाडी येईपर्यंत सर्व साहित्य जळून खाक झाले होते. त्यामध्ये आठ नवीन टायर, कॉम्प्रेसर मशीन, इंजीन आणि किरकोळ साहित्य होते. शेजारी बांधलेला जर्मन शेफर्ड जातीचा कुत्राही आगीत जळून मृत्युमुखी पडला. त्यामुळे हे गरीब कुटुंब हताश झाले. ज्या व्यवसायावर अवलंबून राहून कुटुंब चालवत होते, तोच व्यवसाय डोळय़ादेखत आगीत जळत होता.
सध्या लॉकडाऊन असल्याने रस्त्यावरील सर्व वाहतूक बंद आहे. याच संधीचा फायदा घेऊन समाजकंटकांनी हे कृत्य केले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
शेजारील झाडाला करणीबाधा शिवाय शेजारी असलेल्या झाडाला करणीबाधा करण्यात आलेली आहे. या घटनेची काकती पोलीस स्थानकात तक्रार केली असून पोलीस तपास करीत आहेत. या गरीब कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. नुकसानीबद्दल नागरिकांतून हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस या घटनेचा कसून तपास करीत आहेत.