प्रतिनिधी / बेळगाव
शिक्षक संघटनेची निवडणूक चुरशीने पार पडली. गुरुस्पंदन आणि प्रगतीपरच्या माध्यमातून शहरात अटीतटीची निवडणूक पाहायला मिळाली. मात्र, निकालानंतर 50-50 जागांमुळे सत्ता कोणाची यावर प्रश्नचिन्ह होते. मात्र, मंगळवारी याबाबतचे चित्र स्पष्ट झाले असून बेळगाव शहरात प्रगतीपरने बाजी मारली असून पुन्हा एकदा पाच वर्षांसाठी प्रगतीपरने आपले स्थान कायम टिकविले आहे. गुरुस्पंदन गटातून दोन उमेदवार प्रगतीपरमध्ये आल्याने शहरात प्रगतीपरची सत्ता आली आहे. जयकुमार हेबळ्ळी यांच्या अध्यक्षतेखाली पॅनेल निवडण्यात आले आहे.
याअंतर्गत प्रगतीपरचा अध्यक्ष निवडण्यात आला असून महिला उपाध्यक्षा म्हणून गुरुस्पंदनच्या उमेदवाराला पद देण्यात आले आहे. यामुळे 2020-25 या पंचवार्षिक वाटचालीत प्रगतीपर सत्तेवर राहणार आहे. निवडीनुसार अध्यक्षपदी बाबू सोगलण्णावर, उपाध्यक्ष सुरेश नावलगी, सेक्रेटरी शिवानंद रोडबसण्णावर, खजिनदार गिरीजा मण्णीकेरी, महिला उपाध्यक्षा महादेवी हुलगबाळी यांची निवड झाली असून गौरवाध्यक्ष म्हणून राजू बचन्नटी यांची निवड करण्यात आली आहे.
प्राथमिक शिक्षक संघटनेच्या निवडणुकीत प्रामुख्याने 50 शिक्षकांमागे एक याप्रमाणे उमेदवारांची निवड करण्यात येते. शहरात 14 शिक्षक उमेदवार असतात. अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सेक्रेटरी, महिला उपाध्यक्षा, गौरवाध्यक्षा या पदांबरोबरच इतर शिक्षक पदाधिकारी म्हणून पॅनेलमध्ये कार्यरत असणार आहेत. यावेळी प्रगतीपरचे सर्व उमेदवार उपस्थित होते. निवड होताच गुलाल उधळून सर्वांनी जल्लोष केला.