कोरोना पॉझिटिव्ह असणाऱया परीक्षार्थींसाठी कोरोना केअर सेंटरचीही व्यवस्था
प्रतिनिधी / बेळगाव
शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी दि. 4 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. त्यादृष्टिकोनातून शिक्षण विभागातर्फे पूर्वतयारी करण्यात आली असून मिशन सीईटीची पहिली पायरी असणारी टीईटी नियोजित वेळापत्रकनुसार तब्बल सात महिन्यांनी होणार आहे. यामुळे परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या परीक्षार्थींना दिलासा मिळाला आहे.
कोरोना संकटात परीक्षेसाठी एकूण 23 केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार पहिला पेपर (प्राथमिक शाळा शिक्षक पात्रतेसाठी इ.1 ली ते 5 वी) सकाळी 9.30 ते 12 यावेळेत होणार असून एकूण 3 हजार 394 विद्यार्थी सदर पेपर देणार आहेत. दुसरा पेपर (पदवीधर प्राथमिक शिक्षक पात्रतेसाठी इ. 6 वी ते 8 वी) दुपारी 2 ते 4.30 यावेळेत होणार असून एकूण 6 हजार 819 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. शिक्षक भरती प्रक्रियेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. सदर परीक्षेत उत्तीर्ण झाल्याखेरीज सीईटीसाठी पात्र होता येत नाही.
केंद्रांचे निर्जंतुकीकरण
कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच परीक्षा घेणे मोठे आव्हान आहे. मात्र दहावी, बारावी तसेच इतर परीक्षांप्रमाणे सदर परीक्षा पार पडणार आहे. मास्कची सक्ती, सामाजिक अंतर, सॅनिटायझर्सचा वापर याचे पालन करण्यात येणार आहे. तसेच 23 केंद्रांचे निर्जंतुकीकरण करूनच बैठक व्यवस्था केली जाणार आहे. परीक्षार्थींनी केंद्रांवर परीक्षेपूर्वी एक तास आधी उपस्थित रहावयाचे असून थर्मल स्क्रिनिंग करूनच विद्यार्थ्यांना केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे. स्वतःची पाण्याची बॉटल तसेच लेखनासाठी पेन तसेच गरजेनुसार भौमितिक रचना साहित्य घेऊन येण्याची मुभा देण्यात आली आहे. मोबाईल अथवा इलेक्ट्रॉनिक साहित्य नेण्यास परवानगी नाही.
या केंद्रांवर होणार परीक्षा…
सेंट पॉल्स, सेंट जोसेफ, सेंट मेरी, सेंट झेवियर्स, शर्मन स्कूल, महांतेशनगर कन्नड माध्यम स्कूल, सिद्धरामेश्वर स्कूल, लिटल स्कॉलर अकॅडमी, भरतेश स्कूल, उषाताई गोगटे, बी. के. मॉडेल, चिंतामणराव हायस्कूल, गजाननराव भातकांडे, जी. ए. स्कूल, सरदार्स हायस्कूल, वनिता विद्यालय, बेननस्मिथ, महिला विद्यालय इंग्रजी माध्यम, महिला विद्यालय मराठी माध्यम, मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूल, गोमटेश स्कूल, केएलएस ठळकवाडी, अंजुमन इंग्रजी स्कूल या केंद्रांवर परीक्षा होणार आहे.
सदर परीक्षा पूर्वी 22 केंद्रांवर होणार होती. मात्र बदली केंद्रानुसार विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेत 1 केंद्र वाढविण्यात आले. तसेच सध्याच्या परिस्थितीत कोरोना पॉझिटिव्ह असणाऱया परीक्षार्थींसाठी कोरोना केअर सेंटरची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षार्थींचे नुकसान होऊ नये, यासाठी सदर व्यवस्था करण्यात आली असून यासाठी परीक्षार्थींची स्थिती तसेच पालकांचे संमती पत्र असणे गरजेचे आहे.