दहावीच्या वर्गात सर्वाधिक विद्यार्थीसंख्या बेळगाव शहरात
प्रतिनिधी/ बेळगाव
शैक्षणिक वाटचालीचा अंतिम टप्पा असणारे दहावीचे वर्ष विद्यार्थ्यांसाठी अधिक महत्त्वाचे असते. कोरोनाच्या काळात दहावी परीक्षा घेताना मोठी मेहनत घ्यावी लागली. मात्र 2020-21 या शैक्षणिक वर्षात दहावीमध्ये शिकत असणाऱया विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. व्हेकेशन बॅचच्या माध्यमातून मार्चपासूनच सुरू होणारे दहावीचे शैक्षणिक वर्ष कोरोनामुळे थांबले. अखेर विद्यागमअंतर्गत दहावीच्या विद्यार्थ्यांची वाटचाल सुरू करण्यात आली. अर्थात यंदाच्या मिशन एसएसएलसीसमोर अनेक समस्या उभ्या ठाकल्या असल्या तरी बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातून 34 हजार 869 विद्यार्थी दहावीमध्ये दाखल झाले आहेत.
2020-21 या शैक्षणिक वर्षातील एसटीएस प्रणालीमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यानुसार शिक्षण विभागाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीमध्ये जिल्हय़ातून आतापर्यंत दहावीच्या वर्गात 34 हजारहून अधिक विद्यार्थ्यांची नोंद आहे. ही संख्या कमी-अधिक होण्याची शक्यता असली तरी शाळास्तरांकडून स्टुडंट्स ट्रकिंग सिस्टीममध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे. कोरोनामुळे नववीच्या परीक्षा रद्द झाल्या. यामुळे परीक्षा न देता थेट विद्यार्थ्यांना दहावी इयत्तेत प्रवेश देण्यात आला आहे.
अभ्यासक्रम कपातीबाबत संभ्रम
एसएसएलसीचे शैक्षणिक वर्षदेखील विद्यागमअंतर्गत सुरू करण्यात आले. नियोजित अभ्यासक्रमानुसार शिकवणीला प्रारंभ झाला. मात्र यावेळी अभ्यासक्रम कपातीबाबत कोणतेच चित्र स्पष्ट नसल्याचे दिसून आले. दिवाळीपूर्वी 60 ते 70 टक्के अभ्यासक्रम पूर्तीचे उद्दिष्ट पूर्ण करून अधिकाधिक वेळ सरावासाठी देण्याकडे भर असतो. मात्र, यंदा अभ्यासक्रमाची पूर्ती करणे मोठे संकट आहे. अभ्यासक्रमात 30 टक्के कपात करण्याबाबत जाहीर करण्यात आले. मात्र, नेमका कोणता अभ्यासक्रम वगळला आणि कोणता अध्यापनात आहे, हा संभ्रम जैसे थे आहे. यामुळे कासवगतीने का होईना कोरोना संसर्गाबाबत विशेष दक्षता घेत दहावीचे शैक्षणिक वर्ष सुरू आहे.
जिल्हय़ात सर्वाधिक विद्यार्थी बेळगाव शहरात
दहावीच्या वर्गात सर्वाधिक विद्यार्थीसंख्या बेळगाव शहरात आहे. कित्तूर विभागात सर्वात कमी विद्यार्थी दहावीत आहेत. शहरात दहावीमध्ये 9 हजार 928 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अंतर्गत शहर विभागातून ऑनलाईन शिक्षण, व्हॉट्सऍप ग्रुपच्या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. मात्र, इतर तालुका विभागात ऑनलाईन शिक्षणात समस्या जाणवत आहेत. यामुळे यंदाचे दहावीचे शैक्षणिक वर्ष, अभ्यासक्रमपूर्ती, उजळणी, परीक्षा याबाबत अजूनही संभ्रम आहे.
विभागनिहाय दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या-
बेळगाव शहर- 9928
बेळगाव ग्रामीण- 5882
बैलहोंगल- 4095
कित्तूर- 1902
खानापूर- 3958
रामदुर्ग- 3994
सौंदत्ती- 5110