बेळगाव : बेळगाव जिल्हा शरीरसौष्टव संघटना व मराठा युवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने व एसएसएस फौंडेशन पुरस्कृत 55 वी बेळगाव श्री जिल्हास्तरीय शरीरसौष्टव स्पर्धा शुक्रवार दि. 26 मार्च रोजी मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आली आहे.
सदर स्पर्धा आयबीबीएफच्या नियमानुसार 55 किलो, 60, 65, 70, 75, 80, 80 किलोवरील गटात घेण्यात येणार आहे. प्रत्येक गटातील 5 विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे 5 हजार, 4 हजार, 3 हजार, 2 हजार व 1 हजार असे रोख रक्कमेचे बक्षीस, प्रमाणपत्र, पदक व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. बेळगाव श्री विजेत्यासाठी एस. के. सिद्दण्णावर यांच्या स्मरणार्थ रोख 15 हजार रूपये, मानाचा किताब, आकर्षक चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. उत्कृष्ट पोझरसाठी 5 हजार रूपये रोख, मानाचा किताब व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे टीम चॅम्पियनशीप मिळविणाऱया संघाला 5 हजार रोख, चषक देण्यात येणार आहे. सदर स्पर्धेची वजने 26 मार्च रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत घेण्यात येणार असून, सायंकाळी 5 वा. स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.
ही स्पर्धा संस्थापक एल. आर. पाटील यांच्या प्रेरणेने घेतली जात आहे. इच्छुक स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी बाळासाहेब काकतकर, अजित सिद्दण्णावर, सुनील राऊत, मारूती देवगेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन बेळगाव जिल्हा शरीरसौष्टव संघटनेचे अध्यक्ष अविनाश पोतदार, कार्यकारी अध्यक्ष एम. के. गुरव व प्रमुख सचिव गंगाधर एम. यांनी केले आहे.