मराठा युवक संघाच्या बैठकीत निर्णय
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
मराठा युवक संघाच्या कार्यकारिणी मंडळाची मंगळवारी झालेल्या बैठकीत 55 व्या बेळगाव श्री शरीरसौष्टव स्पर्धेचे आयोजन करण्याबद्दल एकमताने निर्णय घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब काकतकर होते.
या बैठकीत 26 मार्च रोजी मराठा मंदिर येथे बेळगाव श्री मानाची शरीरसौष्टव स्पर्धा भरविण्यात येणार आहे. ही स्पर्धा आयबीबीएफच्या नियमानुसार 55 किलो, 60, 65, 70, 75, 80, 85 व 85 वरील गटात घेण्यात येणार आहे. या प्रत्येक गटातील 5 विजेत्यांना अनुक्रमे 5 हजार, 4 हजार, 3 हजार, 2 हजार, 1 हजार रोख रक्कम, आकर्षक चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. बेळगाव श्री विजेत्याला 15 हजार रूपये रोख, मानाचा किताब, प्रमाणपत्र व आकर्षक चषक देण्यात येणार आहे तर उत्कृष्ट पोझरला 5 हजार रूपये रोख, चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्याशिवाय सांघिक विजेत्याला 5 हजार रूपये रोख व चषक देण्यात येणार आहे. कै. एस. के. सिद्दण्णावर यांच्या स्मरणार्थ बेळगाव श्री किताब विजेत्याला फिरता चषक ईश्वर सिद्दण्णावर यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. या बैठकीत मारूती देवगेकर, चंद्रकांत गुंडकल, कार्याध्यक्ष रघुनाथ बांडगी, अजित सिद्दण्णावर, नारायण किटवाडकर, शिवाजी हंगीरगेकर, श्रीकांत देसाई, सुहास किल्लेकर, दिनकर घोरपडे, सुनील अष्टेकर, नेताजी जाधव आदी सभासद उपस्थित होते.