प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावमधून सुरत व तेथून अजमेर या विमानसेवाचा सोमवारी शुभारंभ करण्यात आला. स्टार एअरने बेंगळूर, मुंबई, अहमदाबाद, इंदूर, अजमेर नंतर आता सुरत शहराला विमानसेवा सुरू केली आहे. बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी या विमानसेवेचा शुभारंभ केला.
बेळगाववरून सुरतला जाण्यासाठी बस तसेच इतर खासगी वाहतूकीसाठी 16 तास लागत होता. परंतु आता प्रवाशांना अवघ्या 1 तास 20 मिनिटांमध्ये सुरतला पोहचता येत आहे. सुरत हे एक व्यापारी शहर म्हणून ओळखले जात असल्याने या शहराला विमानसेवा सुरू करण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून करण्यात येत होती.
स्टार एअरने ही विमानसेवा सुरू केली असून बेळगावमधून 3 दिवस सुरतला व तेथून अजमेरपर्यंत प्रवास करता येणार आहे. या विमानसेवेमुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण तसेच उत्तर कर्नाटकाला फायदा होणार आहे. परिसरातील व्यापाऱयांना अवघ्या काही तासांमध्ये आता सुरतला पोहचता येणार आहे. त्यामुळे कापड व्यापाऱयांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
पहिल्याच दिवशी या विमानसेवेला उत्तम असा प्रतिसाद मिळाला. 50 आसन क्षमता असणाऱया विमानातून सुरतला 31 प्रवासी गेले तर सूरतवरून 40 प्रवासी बेळगावमध्ये दाखल झाले. सुरत विमानतळावर प्रवाशांचे सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. उद्घाटनाप्रसंगी बेळगाव विमानतळ संचालक राजेशकुमार मौर्य, स्टार एअर व संजय घोडावत ग्रुपचे मार्केटिंग प्रमुख राज हेसी यांच्यासह कर्मचारी व प्रवासी उपस्थित होते.