प्रतिनिधी / बेळगाव
देशातील एक व्यापारी शहर म्हणून ओळख असणाऱया सूरतला आता बेळगावमधून विमानाने पोहचता येणार आहे. घोडावत गुपचे स्टार एअर येत्या 10 नोव्हेंबरपासून ही सेवा सुरू करणार आहे. उडान योजनेंतर्गत हा मार्ग उपलब्ध झाला असल्याने कमी खर्चात प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. यामुळे बेळगावच्या व्यापारी क्षेत्राला चालना मिळणार आहे.
सूरत हे व्यापारी शहर असल्याने बेळगावमधून व्यापारी, उद्योजकांची सूरतला नेहमी ये-जा असते. सूरतला थेट विमानसेवा नसल्याने त्यांना अहमदाबादपर्यंत प्रवास करून तेथून इतर पर्यायांनी सूरतला पोहचावे लागत होते. गुजरातमधील अनेक कुटुंबे व्यवसायानिमित्त बेळगावमध्ये स्थायिक झाली असून त्यांचीही नेहमी ये-जा असते. त्यामुळे बेळगाव ते सूरत अशी थेट विमानसेवा सुरू करण्याची मागणी होत होती.
सोमवार, बुधवार, शुक्रवार व रविवार अशी चार दिवस विमानसेवा असणार आहे. सकाळी 12 वा. विमान बेळगावमधून उड्डाण घेऊन दुपारी 1.20 वा. सूरतला पोहचणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी 5.30 वा. सूरत येथून उड्डाण घेऊन 6.50 वा. बेळगावला पोहचणार आहे. सध्या स्टार एअर बेळगावमधून बेंगळूर, मुंबई, अहमदाबाद, इंदूर, किशनगड या शहरांना विमानसेवा देत आहे. त्यात आता सूरतची भर पडणार आहे.
यापूर्वी बेळगाव-इंदूर-किशनगड (राजस्थान) अशी विमानसेवा सुरू होती. परंतु लॉकडाऊनपासून ही विमानसेवा बंद करण्यात आली होती. स्टार एअरला उडान योजनेंतर्गत बेळगाव-सूरत-किशनगड हा मार्ग मंजूर झाल्याने आता पुन्हा किशनगडला जाता येणार आहे.